राजापुरात बीएसएनएल सेवेला घरघर, नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांची गैरसोय

 

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहर आणि तालुका परिसरात बीएसएनलच्या सेवेला आता अखेरची घरघर लागली आहे. तालुका आणि शहर परिसरात बीएसएनलच्या इंटरनेट सुविधाचा पुरता बोजवारा उडाला असून ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणीच वाली नसल्याने दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

राजापूर शहर आणि तालुका परिसरात बीएसएनलच्या सेवा आता अखेरची घटका मोजत आहे. बीएसएनलच्या कोलमडलेल्या सेवेमुळे बीएसएनलचे लॅन्डलाईन फोन इतिहास जमा झाले आहेत. बीएसएनलची इंटरनेट सुविधेलाही आता घरघर लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात अनेकांनी आपल्या घरी व कार्यालयांमध्ये बीएसएनलची इंटरनेट सुविधा घेतली आहे. अनेकांनी वेगवेगळया प्लॅनचे आगाऊ पैसेही अनेकांनी भरले आहेत.

मात्र गेली महिनाभर वारंवार बीएसएनलची इंटरनेट सेवा कोलमडत आहे. याचा फटका जनतेला बसत आहे. बँका, शासकिय कार्यालयांतील सेवा इंटरनेट अभावी ठप्प असल्याने ग्रामीण भागातील जनतेला काम न होता परत जावे लागत आहे. कार्यालयात कुणी वाली नसल्याने दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न आहे.