जिल्ह्याला न्याय देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकारी व्हावे : तहसीलदार अरुण उंडे

आरोस विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न.

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा हा बुद्धिवंतांचा जिल्हा आहे. येथील विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. आता विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत करिअर करण्यासाठी झोकून द्यावे, आपल्या जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अधिकारी बनणे क्रमप्राप्त आहे असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांनी आरोस येथे केले.

विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी तहसीलदार अरुण उंडे बोलत होते. व्यासपीठावर करियर गाईडन्स समुपदेशक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य अल्ताफ खान, प्राचार्य प्रभाकर नाईक, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश उर्फ बाळा परब, माजी अध्यक्ष भाऊ कामत, उपाध्यक्ष श्री. सावळ, सचिव शांताराम गावडे, खजिनदार बाळा मोरजकर, संजू पांगम, आरोसचे पोलीस पाटील महेश आरोसकर, उपसरपंच सरीता नाईक, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन परब, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, आरोस ग्रामपंचायत सदस्य मनीषा परब, पालक – शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुषमा मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. रुपेश पाटील म्हणाले, आपल्या घरच्या परिस्थितीचे भांडवल करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याचे धाडस करा, जीवनात परिस्थितीचे भांडवल करणारे कधीच यशस्वी होत नाहीत, या उलट विपरीत परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालणारे इतिहास बदलतात आणि भांडवल करणारे तोच इतिहास वाचत असतात. स्पर्धा परीक्षांची कास धरून आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य अल्ताफ खान, प्रभाकर नाईक, हेमंत कामत यांनीही आपले विचार व्यक्त केले.

दरम्यान, दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी रिया घोगळे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच आदर्श विद्यार्थी म्हणून अपूर्वा नाईक, आदर्श शिक्षक विवेकानंद सावंत, आदर्श पालक संतोष पिंगुळकर, कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली क्रीडापटू मयुरी आरोसकर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या प्राध्यापिका सुषमा मांजरेकर आणि विद्या सेवक पतपेढीवर संचालक पदी बिनविरोध निवड झालेल्या शिक्षिका अनुष्का गावडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक निलेश देऊलकर यांनी केले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सुषमा मांजरेकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. हस्तलिखिताचे प्रकाशन तहसीलदार व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
गुणगौरव समारंभाचे सूत्रसंचालन मोहन पालेकर यांनी केले. शेवटी उपस्थित त्यांचे आभार मुख्याध्यापक सदाशिव धूपकर यांनी मानले.