डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात राज्य क्रीडादिन उत्साहात साजरा

मंडणगड : प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ F1428 मुंबई संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयमंडणगड, मध्ये ऑलम्पिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडादिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात विविध क्रीडा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी भारताला ऑलम्पिक मध्ये सर्वप्रथम ब्रांझ पदक मिळवून देणारे, कुस्तीपटू श्री.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी व पर्यवेक्षक श्री.शांताराम बैकर यांनी दीप प्रज्वलन करून, प्रतिमेस पुष्प अर्पण केले. विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. संजय अवेरे यांनी विद्यार्थ्यांना श्री.खाशाबा जाधव यांची माहिती दिली.

खाशाबा जाधव यांनी लहानपणापासून आपल्या आजोबांकडून कुस्तीचे बाळकडू गिरवले. त्यांचे वडील ही कुस्तीपटू होते. बारीक चणीचा असलेला हा क्रीडापटू वयाच्या आठव्या वर्षी पहिली कुस्ती जिंकला होता. साताऱ्यातील या कुस्तीपटूने पुढे 1952 मध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये भारताला ब्रांझ पदक मिळवून दिले. आणि ऑलिंपिक मधील ते भारताचे पहिले पदक ठरले. जागतिक कीर्तीवर त्यामुळे महाराष्ट्राचा ठसा या कुस्तीपटू ने उमटवला. त्यांचा हा जन्मदिवस ,’राज्य क्रीडादिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यालयात विविध क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
विद्यालयातील क्रीडाशिक्षक श्री.मनोज चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.