स्वतःची काळजी स्वतः घेणे हीच अपघातापासून वाचण्याचा उत्तम मार्ग आहे.

नितीन पाटील मोटार निरीक्षक रत्नागिरी

परशूराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या शाळेत आज दिनांक १७ जानेवारी रोजी ३५ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आर. टी. ओ कार्यालय रत्नागिरी यांचे मार्फत जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाची उपस्थित अफरिन मुल्लाणी,नितीन पाटील वाहतूक निरीक्षक रत्नागिरी तसेच यांचे शाळेच्या वतीने पुष्प देवून स्वागत केले.

नितीन पाटील यांनी विद्यार्थांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले.दिवसेंदिवस रस्ते अपघात हा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला आहे.दर वर्षी सुमारे एक लाखापेक्षा अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावत आहेत.याला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. आपणच आपली काळजी घेतली,वाहतुकीचे नियम पाळून जर गाडी चालवली तर अपघात प्रमाण नक्की कमी होईल. त्यांनी विद्यार्थांना अपघात होऊ नये यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यावी याबाबत तीन महत्वपूर्ण नियम सांगितले.रस्त्यावरील चिन्हांकडे लक्ष द्या त्यातून पुढे असणाऱ्या धोक्याची जाणीव होईल.सेफ्टी बेल्ट लावा,ओव्हर स्पीड गाडी चालवू नका,मोबाईल वर बोलत बोलत गाडी चालवू नका,एकसलग पणे गाडी चालवू नका,काही काळानंतर विश्रांती घ्या म्हणजे अपघात होणार नाहीत.

अपघाताचे प्रमाण पाहिले तर होणाऱ्या अपघातातील सुमारे ६५% अपघात हे मोटार सायकलचे होताना दिसत आहेत.यातून मृत्यूची शक्यता जास्त असते.अशा वेळी हेल्मेट वापरा,गाडी जास्त स्पीडने चालवू नका यासारख्या सूचना आणि नियमांचे मार्गदर्शन केले.

कारमध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावला तर अपघातात प्राण वाचण्याची शक्यता असते. यासोबत पायी चालणाऱ्या लोकांनी कोणते नियम पाळावेत याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.ज्या ठिकाणी फुटपाथ नाही अशा ठिकाणी उजव्या बाजूने चाला तर ज्या ठिकाणी फुटपाथ आहे अशा ठिकाणी डाव्या बाजूने चाला.

अपघात झालाच तर मोबाईलवर शूटिंग करण्याऐवजी 108 नंबर डायल करून अँब्युलन्स बोलवा म्हणजे अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळेल आणि त्यांचा प्राण वाचायला मदत होईल.यापुढे नव्या नियमानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अथवा न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागणार नाही त्यामुळे वेळीच त्यांना मदत करा असे आवाहन त्यांनी सर्व मुलांना केले.तसेच हा संदेश आपल्या पालकांना सांगण्याबाबत सांगितले.

सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करूया हे सांगत असताना त्यांनी सर्व मुलांना वयाची 18 वर्ष पूर्ण नसतील तर गाडी चालवू नये याबाबत सक्त सूचना दिल्या. अशी मुले सापडल्यास त्यांच्या नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील मॅडम यांनी रस्ते अपघात होऊ नये यासाठी आपली जबाबदारी काय आहे याची मुलांना जाणिव करुन दिली. पालकांकडे गाडीसाठी हट्ट करू नका,हे जीवन अतिशय सुंदर आहे त्याचा परिपूर्ण असा आनंद घ्या.एका चुकीच्या निर्णयाने चांगल्या आयुष्याला मुकु नका.स्वतः ची काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांची ही काळजी घ्या असा मौलिक संदेश आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थांना दिला.उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रमुख पाहुणे यांचा परिचय शाळेचे उपमुख्याध्यापक श्री संजय बनसोडे सर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अफरीन मुल्लाणी,नितीन पाटील वाहतूक निरीक्षक रत्नागिरी,चालक श्री.बनसोडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री संजय बनसोडे सर, पर्यवेक्षक श्री संदीप मुंढेकर सर ,शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.