राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक व प्लंबींग वस्तुंची विक्री व प्रदर्शनाचा शुभारंभ बुधवारी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
जवाहर चौकातील पिकअप शेड सभागृहात बुधवार दि. १७ व गुरूवार दि. १८ जानेवारी असे दोन दिवस प्रदर्शन ग्राहकांसाठी खुले रहाणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे, अॅड. वाय. जे. कावतकर, ठेकेदार संदीप देशपांडे, ठेकेदार विठोबा खांबल, प्रविण तोरस्कर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, हॉटेल व्यवसायिक संतोष काणेकर, रिक्षा चालकमालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, सेक्रेटरी प्रभाकर गुरव उपाध्यक्ष विनायक सावंत यांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना संदीप मालपेकर यांनी अत्यंत चांगला उपक्रम राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशनने राबविल्याचे नमुद करत शुभेच्छा दिल्या. तर अॅड. वाय. जे. कावतकर संघटनेच्या माध्यमातुन संघटीतपणे काम करण्यात मोठी ताकद असते असे नमुद करत राजापुरातही ग्राहकांना अशा विविध वस्तु उपलब्ध होऊ शकतात हे देखील या शिबीराच्या माध्यमातुन ग्राहकांच्या लक्षात येईल असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशनच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजापूर अर्बन बँक संचालक प्रकाश कातकर, सुरज पेडणेकर आदींसह व्यापारी राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या शिबीरात प्रदर्शन विक्रीसाठी राजापूर तालुका इलेक्ट्रीकल प्लंबर असोसिएशनच्या वतीने अनेक व्यावसायिकांनी आपले स्ट्रॅाल लावले आहेत. गुरूवारी देखील ग्राहकांना या शिबीरात भेट देऊन वस्तु पहाता व खरेदी करता येणार आहेत.











