मंडणगड येथील गोठे येथील कातळशिल्पे प्रतिसादच्या प्रतीक्षेत 

संशोधक अभ्यासकांना साद, तालुक्याचे पर्यटनास नवे आयाम मिळण्याची शक्यता

मंडणगड l प्रतिनिधी : तालुक्यातील गोठे व बोरखत या दोन गावांच्या हद्दीत कोकणात आढळून येणारी व जागतीक धरोवर असा मान मिळालेली दोन कातळ शिल्पे आढळून आली आहेत. कोकणातील जांभ्या कातळाच्या काळा पृष्ठ भागावार अश्मयुगीन काळातील रेखाटलेली चित्रे आढळून येतात. मानवी सभ्यता व संस्कृतीच्या विकासाचे विविध टप्पे या चित्रांमधुन उद्भुत होत असल्याची सर्वमान्यता आहे. तालुक्यातील गोठे व बोरखत गावात वाघ कातळ या नावाने ही दोन शिल्पे परिचीत असून सद्यस्थितीत ती एका खाजगी मालकीच्या जागेत आहेत. या चित्रात वाघ व हत्ती याची चित्रे कोरलेले असल्याचे दोन्ही गावातील ग्रामस्थांचे मत आहे.

 

पुर्वी मोकळे रान असताना ग्रामस्थ ही शिल्पे धवून चुन्याने रंगवून त्यांचे जतनही करत असत मात्र काळाच्या ओघात ही शिल्पे नष्ठ होत आहेत या संदर्भात स्थानीक पातळीवर जाणीव जागृतीची अभावाचे चित्र आहे.या पार्श्वभुमीवर येथे संशोधन केल्यास अजूनही चित्रे सापडण्याची दाट शक्यता असल्याने या विषयाचा अभ्यास असणाऱ्या संशोधकांनी या शिल्पाची पाहणी करुन या परिसरात आणखी काही शिल्पे आढळतात का याची चाचपणी करावी लागेल. सद्यस्थितीत येथे मानवी वस्ती वाढू लागली आहे हे खरे असले तरी पुर्वी हा भाग गावाच्या बाहेर जंगल म्हणूनच गणला गेला आहे. व कातळावर चित्रे काढलेली असल्याची माहीती येथील गावातील ग्रामस्थांना खुप आधीपासून आहे किंबहुना ही चित्रे येथील समाज जीवनाचा एक भाग होती असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणारे नाही. कातळ शिल्पांना जागतीक धरोवरीचा सन्मान मिळालेला आहे त्यामुळे येथे आणखी शिल्पे सापडल्यास पर्यटनांच्या विविध आयामांमध्ये कातळ शिल्पांचे तालुक्यातील अस्तित्व ही जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अभ्यास होण्याची गरज आहे. या परिसरातील अन्य गावातही अशाच प्रकारची शिल्पे असण्याचीही शक्यता आहे. काही वर्षापुर्वी येथून जवळ असणाऱ्या पंदेरी या गावाच्या सुमेवर एका गुहेत काही शिल्पकलेचे नमुने आढळलेले असल्याने या विषया संदर्भात अभ्यासाची गरज वेळोवेळी निर्माण झालेली आहे.