अयोध्देत श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना सोहळयाचे औचित्याने

सोमवार २२ जानेवारी रोजी श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिरात मंगल कार्यक्रमांचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या शुभ दिनी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथिल भव्य-दिव्य राम मंदिरातील नूतन बाल मुर्ती मंदिरातील गर्भगृहात स्थापित करुन त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत आहे. यावेळी सर्व देशभर अवर्णनिय आनंदमय वातावरणही असणार आहे. या सुमुहूर्ताचे औचित्य साधून आपल्या शहर बाजारपेठेतील पुरातन श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर संभाजीपेठ येथे दिवसभर मंगल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त रविवार दि. २१ जानेवारी २०२४ सायं. ४.०० ते ७.०० वा. आंबेकर गृप यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम तर सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते ११ वा. रामयाग, अभिषेक, पुजा आरतीण, दुपारी ११.०० वा. अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (मोठ्या स्क्रिनवर), १२.३९ वा. घंटा नाद होईल. दुपारी दुपारी ३.४५ वा. शिवतिर्थाजवळ राजापूरातील सर्व रामभक्त एकत्र येत ४.०० वा. शिवतिर्थ येथून एकत्रित श्रीरामनामाचा जप करत विठ्ठल मंदिरामध्ये येणार आहेत. या ठिकाणी दुपारी ४.३० वा. रामरक्षा, मारुती स्तोत्र, १०८ वेळा राम नामाचा जप, सायं.५.३० वा. आरती, प्रसाद तर सायं. ६.३० वा. दिपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

राम भक्ति हा सर्वोच्च आनंद, समाधान व रामाची सेवा हीच जीवनाची परिपूर्तता आणि जीवन ध्येयाची सांगता आहे. तेव्हा संपूर्ण दिवस होणाऱ्या या रामभक्ति यज्ञात व भक्तिमय वातावरणात आपण सर्वजण तल्लीन होऊया असे आवाहन श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिराचे अध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले आहे.