राजापूर (प्रतिनिधी): राजापूर नगर परिषदेच्या वतीने सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री रामाच्या मुर्ती प्रतिष्ठापणा सोहळयानिमित्त प्रभू श्री राम मंदिरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या सोहळयानिमित्त सोमवारी २२ जानेवारी रोजी राजापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.
स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत राजापूर शहरातील प्रभू श्री राम मंदिरासह विविध भागात असणाऱ्या १८ मंदिरांच्या ठिकाणी जाऊन या मंदिरांची व आजुबाजुच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.
मंदिराच्या परिसरासह रस्ते व अन्य भागाचीही स्वच्छता करण्यात आली. सोमवारी स्थानिक नागरिक, मंदीर व्यवस्थापन समिती यांच्या सहयोगातुन मंदिरांमध्ये विद्युत रोषणाईसह दिप प्रज्वलीत करून हा सोहळा साजरा केला जाणार आहे. नागरिकांनी यात उस्फुर्त सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.











