रत्नागिरी : नर्मदा रहस्य आणि तीर्थवर्णन या विषयावर नर्मदा साधक उदयन आचार्य यांचे येत्या रविवारी (ता. १९) सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात व्याख्यान होणार आहे. गोईंगो टुरिझमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
उदयन आचार्य यांनी तीन वेळा पायी नर्मदा परिक्रमा केली आहे. त्यांनी नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांनी बी. कॉमचे शिक्षण घेतल्यानंतर २५ वर्ष कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी केली. त्यांनी नर्मदा परिक्रमेचा संकल्प २०१५ पासून २०१९ पर्यंत तीन वेळा पायी परिक्रमा करूव पूर्ण केला. त्यांना नर्मदा परिक्रमेची प्रेरणा सौ. प्रतिभा व सुधीर चितळे व औरंगाबाद येथे स्थायिक असलेल्या नर्मदाप्रसाद ऊर्फ अण्णा महाराज बावस्कर यांच्या अनुभव कथनातून आणि भारती ठाकूर, जगन्नाथ कुंटे, चंद्रकांत पवार, सुहास लिमये यांच्या पुस्तकांमुळे झाली. आचार्य यांचे अनुभव ऐकण्यासाठी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केदार जोशी यांनी केले आहे.