अंगणवाडी सेविका विधी साक्षर झाल्यास समाजातील महिलांना फायदा : तहसिलदार अरुण उंडे

Google search engine
Google search engine

सावंतवाडीत अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळा

अर्चना घारे – परब यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्वातंत्र्यानंतर आज अनेक वर्षांनंतरही महिलांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरीही आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा मोठा सहभाग आहे. अशावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक समस्या समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्राद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी अर्चना घारे-परब यांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अंगणवाडी सेविका हा एक समाजातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा दुवा आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका विधी साक्षर झाल्यास समाजातील महिलांना त्याचा नक्कीच फायदा होऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल, असे मत सावंतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचा शुभारंभ तहसीलदार अरूण उंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, ॲड. आरती पवार, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई, संध्या मोरे, ॲड. सिद्धी परब, युवती अध्यक्षा सावली पाटकर, रिद्धी परब, प्रिया परब, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, संतोष जोईल, नवल साटेलकर, प्रा. सचिन पाटकर, रामदास गवस, वैभव परब, बाबल्या दुभाषी, याकुब शेख आदी उपस्थित होते.
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांसाठी या सेंटरच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेशीर सल्लागारांच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका अर्चना घारे -परब म्हणाल्या, अंगणवाडी सेविका ह्या अत्यंत कष्टाळू असून त्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात. कोरोनासारख्या संकंटाच्या काळातही त्या गावातील प्रत्येक महिला व मुलांपर्यंत पोहोचलेल्या होत्या.  कायद्याचं ज्ञान हे प्रत्येकाला असण गरजेच आहे.

आपल्या परिसरात कौटुंबिक हिंसाचारासारख्या घटना घडत असतात. मात्र, त्या महिला पुढे येत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत पोहोचणं व त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत पोहोचवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासह कायदेशीर सल्ला तसेच पोलिसांची मदतही मिळवून द्यायला मदत होणार आहे. त्यासाठी हे अभियान राबविण्यात आले    असुन यातून नक्कीच अनेक केसेस ग्रामीण भागातून या ठिकाणी येतील व एखाद्याच कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर ते वाचविण्यासाठी या सर्वांना सहकार्य मिळेल, असं मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ॲड. आरती पवार, दर्शना बाबर देसाई, मंगल कामत, संध्या मोरे आदींचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे तहसीलदार अरूण उंडे तसेच अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संध्या मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. अर्चना घारेंबद्दल केवळ ऐकलं होतं.आज प्रत्यक्षात त्यांचं कार्य पाहता आलं. कोरोना काळासह इतरही आपत्ती काळात आमच्या अंगणवाडी सेविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. आज कायदा विषयक समुपदेशनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका विधी साक्षर होतील व याचा फायदा समाजात वावरताना होईल.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कायदेशीर सल्लागारानी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. स्त्री- पुरुष भेदभाव नाही म्हटलं तरी अजून शिल्लक आहे. या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून समानता, मुलभूत हक्कांची जाणीव महिलांना व्हावी या दृष्टीने कायदेशीर समुपदेशन व मार्गदर्शन केंद्राद्वारे केलं जातं आहे. स्त्रीयांना कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन आमच्या माध्यमातून केल जात. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत जाण्याचा अंगणवाडी सेविका हा एक दुवा आहे. ग्रामीण भागातील समस्याग्रस्त अशा महिलांना समुपदेशन केंद्राशी जोडण्यासाठी त्यांची मदत होईल असं मत ॲड. सायली दुभाषी यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

तर ॲड. सिद्धी परब म्हणाल्या, समाजातील प्रत्येक स्त्रीला कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून स्त्रीयांवर अन्याय होत असल्यास आम्ही त्यांना न्याय मिळवून देतो.
समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिला असल्यानं महिलांच्या भावना समजून घेण व त्यांना समजावण अधिक सोयीस्कर रित्या शक्य होत. महिलांना कोर्टाची पायरी चढायला न लावता समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणीवर तोडगा निघावा यासाठी या केंद्राच्या माध्यमातून केल जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अंगणवाडी सेविकांसोबत हळदीकुंकू समारंभानंतर या कार्यशाळेचा समारोप झाला. उपस्थित अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमाबद्दल अर्चना घारे-परब यांचे आभार मानत त्यांच्या कार्याच कौतुक केले. महिला म्हणून आपण करत असलेल्या कार्याचा अभिमान वाटतो अशा भावना अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन पाटकर यांनी तर आभार पुंडलिक दळवी यांनी मानले.