खेड(प्रतिनिधी) खेड नगर परिषदेचा कारभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या हातात असतानाच त्यात लेखाधिकाऱ्यांचीही भर पडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील नगर परिषदेत प्रभारी लेखाधिकारीच कामकाज पहात आहेत. आठवड्यातून केवळ एकच दिवस येथील नगरपरिषदेत कामकाजासाठी येणाऱ्या लेखाधिकाऱ्यांमुळे दैनंदिन बिलांसह अन्य कामकाजाबाबतच्या बिलांचा खोळंबाच होत आहे. प्रभारींमुळे कामाचा पुरता बोजवाराच उडाला असून दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांना खेटेच मारावे लागत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून येथील नगरपरिषदेचा कारभार प्रभारी मुख्याधिकारीच पहात आहेत. चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे प्रभारी कारभाराची धुरा सोपवण्यात आली आहे. दोन नगरपरिषदांसह दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांची दमछाकच होत आहे. येथील नगरपरिषदेत मोजकेच दिवस येणाऱ्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे विकासकामांचा खोळंबाच होत असून नागरिकांच्या समस्याही सुटण्यास विलंब होत आहे.
प्रभारी मुख्याधिकारी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत असले तरी प्रभारी लेखाधिकाऱ्यांमुळे देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. येथील नगरपरिषदेत नियुक्त लेखाधिकाऱ्यांची चार – पाच महिन्यांपूर्वीच अन्यत्र बदली झाली. त्यानंतर येथील कार्यभार दापोलीच्या लेखाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. ते देखील आठवड्यातून एकच दिवस येथील नगरपरिषदेत येत होते.
सद्यस्थितीत गुहागरच्या अधिकाऱ्यांकडे येथील कार्यभार सोपवण्यात आला आहे. तेही केवळ गुरूवारीच येथे येत आहेत. यामुळे कामकाजाचा पुरता बोजवाराच उडाला आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यां पाठोपाठ आता प्रभारी लेखाधिकाऱ्यांचाही प्रकार सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्याधिकाऱ्यांपाठोपाठ आता कुणी कायमस्वरूपी लेखाधिकारी देता का? अशी उपहासात्मक आळवणी करण्याची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे.










