गुरुवारी पार पडली निवड प्रक्रिया
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या विशेष समितीच्या सभापती निवडी गुरुवारी पार पडल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम, आणि बालकल्याण या समीत्यांवर भाजपाच्या तीन नगरसेवकांची निवड झाली तर पाणीपुरवठा समिती सभापतीपदी शिवसेनेच्या नगरसेवकाची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या विशेष समितीच्या सभापती पदाची निवड गुरुवारी लांजा नगर पंचायत सभागृहात पार पडली. या यावेळी सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी मंगेश लांजेकर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे बालकल्याण समितीच्या सभापती पदी मधुरा मिलिंद लांजेकर यांची तर बालकल्याण समिती उपसभापतीपदी शीतल सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा समिती सभापतीपदी शिवसेनेचे प्रसाद डोर्ले यांची निवड बहुमताने करण्यात आली. या निवडणुकीत पिठासन अधिकारी म्हणून राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने यांनी काम पाहिले.
यावेळी लांजा नगरपंचायतचे नगराध्यक्ष मनोहर बाईत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षला राणे यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते. या विशेष समितीवर निवड झालेल्या तीनही नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.












