व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी संशयाची सुई वनविभागाकडेच ?

एक आरोपी अद्यापही फरार तर मुद्देमाल मिळवण्यात अद्यापही वनविभागाला अपयश
वनविभाग या प्रकरणात नक्की कुणाच्या दबावाखाली कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका

राजापूर / प्रतिनिधी –
रत्नागिरी वनविभागाचा कारभार दिवसेंदिवस भोंगळ होत चालला असुन गत आठवड्यात व्हेल माशाची तस्करी पकडल्याची घटना माध्यमांपासुन लपवुन ठेवण्यामागचे नेमके कारण काय ? या प्रकरणी नेमके सुत्रधार कोण ? असे अनेक प्रश्न समाजाच्या विविध स्तरातुन विचारले जात आहेत. या तस्करी प्रकरणावर पडदा टाकण्याचा वनविभागाचा हा प्रयत्न नेमका का व कोणाला वाचवण्यासाठी होता असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोकणात कुऱ्हाडबंदी लागु झाल्यानंतर शासनाचे हे खाते म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चराउ कुरण बनले आहे. शासनाच्या वनविभागाचा कारभार कायमच संशयास्पद ठरलेला आहे. एकिकडे कागदावर कुऱ्हाडबंदी असताना दरदिवशी जिल्हाभरातुन शेकडो ट्रक लाकुड घाटमाथ्यावर कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यासह परराज्यात राजरोसपणे वाहतुक केले जाते. वाहतुक पास देताना त्यावर किती घनफुट लाकुड वाहतुक केली जाणार आहे याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात मात्र कितीतरी जास्त लाकुड वाहतुक केली जाते. जिल्ह्यात सध्या सर्वत्र मोठ्याप्रमणावर विनापरवाना जंगल तोडही सुरु असल्याचे चित्र आहे व या सर्वाला या वनविभागाचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
दिनांक ४ फेब्रूवारी २०२४ रोजी विभागिय वनाधिकारी रत्नागिरी ( चिपळुण ) यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांच्या मदतीने राजापूर वनविभागाने मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी रोखण्यासाठी सापळा रचला होता. यातील चार आरोपीना ताब्यातही घेतले होते. मात्र त्याबाबतची माहिती पत्रकाराना देण्यास टाळाटाळ केली होती. घटना घडुन सुमारे एक आठवड्याचा कालावधी उलटला तरी वनविभाचे अधिकारी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवुन गप्प होते.

यातील चार आरोपीना वनविभागाने ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले असले तरी या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. तर यातील एक आरोपी अद्यापही फरार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणात वनविभागाच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या प्रकरणातील एक संशयीत आरोपी फरार आहे कि वनविभागाने त्याला फरार केले आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतुन विचारण्यात येत आहे.

ज्यावेळी ही तस्करी वनविभागाने रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा यातील तीन आरोपीनी वनविभागाच्या अधिकार्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत पळुन जाण्यात यस मिळवले होते. त्यानंतर यातील तीन आरोपीना वनविभागाने गगनबावडा येथुन ताब्यात घेतले असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले असले तरी या तिनही आरोपीना मुद्देमालासह पळुन जाण्यास कसे यशस्वी झाले ? असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतुन विचारण्यात येत आहे.

सुमारे एक आठवड्याचा कालावधी होत आल्यानंतर वनविभागाने याबाबतची प्रेस नोट शुक्रवार दिनांक ९ फेब्रूवारी २०२४ रोजी सायंकाळी पत्रकाराना व्हॉटस ॲप वर दिली असली तरी त्यात तृटी असल्याचे कारण देत ती प्रेस नोट लगेच डिलिट केली होती व त्यानंतर रात्री १० वाजता सुधारीत प्रेस नोट देण्याचा फार्स पुर्ण केला. त्यामुळे आता वनविभागाच्या कारभारावरच सर्वसामान्य जनतेतुन शंका घेतल्या जात आहेत.

यातील फरार संशयीत आरोपीचा शोध घेण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नसुन त्याचे पुर्ण नावही अद्यापही वनविभागाच्या अधिकाऱ्याना शोधता न आल्याने आता राजापूर तालुक्यातील त्या नावाच्या व्यक्तींची चौकशी करण्याचा फार्स वनविभागाने सुरु केला आहे . परिणामी याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असुन त्या फरार संशयीत आरोपीच्या नावाशी सांधर्म्य असणाऱ्या व्यक्तींची चौकशी वनविभागाने सुरु केल्याने समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींची नाहक बदनामी होत आहे .
……

याबाबतची माहिती सुमारे एक आठवड्याने देण्याचे कारण विचारले असता राजापूर वनविभागे आपला अंगुली निर्देश परिक्षेत्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केला असुन परिक्षेत्र वनाधिकारी यानी याबाबतची माहिती हे दिपक खाडे , विभागिय वन अधिकारी रत्नागिरी ( चिपळुण ) यांच्याकडुन दिली जाते असे सांगत आपले हात झटकण्याचा राजापूर वनविभागाप्रमाणेच प्रयत्न केला

या संपुर्ण प्रकरणात वनविभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर आली असुन अद्यापही परिक्षेत्र वनाधिकारी व विभागिय वनाधिकारी संपुर्ण माहिती देण्याचे टाळत असल्याने या प्रकरणात नक्की कुणाचा दबाव आहे व कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन विचारण्यात येत आहे .