15 पासून काम सुरू न झाल्यास 16 रोजी रास्ता रोकोचा ईशारा
राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील गावखडी ते धारतळे मार्गाच्या कामाच्या पुर्ततेबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयाचा अनागोंदी कारभार आणि ठेकेदाराकडून काम करण्यास होणारी टाळाटाळ या विरोधात गुरूवारी राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली नाटे, साखरीनाटे व राजापूरातील नागरीकांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर कार्यालयावर धडक दिली.
यावेळी 15 मार्च पासून हे काम सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरचे शाखा अभियंता पी. एस. कांबळे यांनी यावेळी या शिष्टमंडळाला दिली. मात्र 15 पासून काम सुरू झाले नाही तर मात्र कोणतीही पुर्वकल्पना न देता रास्ता रोको करू असा ईशारा खलिफे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.
तालुक्यातील गावखडी ते धारतळे मार्गाच्या कामासाठी शासनाकडून साडेपाच कोटीचा निधी मंजूर आहे. सुमारे 15 कीलो मिटरचे काम यातुन होणार आहे. सदरचे काम सुरू करण्यासाठी संबधीत ठेकेदाराला फेब्रुवारी 2022 मध्ये वर्क ऑडर देण्यात आलेली आहे. मात्र ठेकेदाराकडून काम करण्यास चालढकल केली जात आहे. सध्या केवळ मोऱ्यांची कामे करण्यात आली असून उर्वरीत कामे अपुर्ण आहेत. या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या ठीकाणी वारंवार अपघात होत असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत असून अनेक जण जायबंदी होत आहेत. याबाबत आजपर्यंत तीन वेळा बांधकाम विभागाशी संपर्क साधून पाठपुरावा करून काम सुरू करावे अशी मागणी करण्यात येऊनही या विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ॲड. खलिफे यांनी केला. संबधित ठेकेदाराला बांधकाम विभाग पाठीशी घालत असल्याने वर्षभर उलटले तरी काम पुर्ण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुरूवारी पुन्हा एकदा त्यांनी बांधकाम विभागात धडक देत याबाबत जाब विचारला. यावेळी 15 मार्च पासून उर्वरीत काम सुरू करून महीनाभरात पुर्ण करून घेतले जाईल अशी ग्वाही कांबळे यानी यावेळी या शिष्टमंडळाला दिली. मात्र 15 रोजी काम सुरू झाले नाही तर मात्र 16 रोजी कोणतीही पुर्वकल्पना न देता रास्ता रोको करू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा ईशाराही ॲड. खलिफे यांनी दिला आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर, जिल्हा बँक संचालक व मच्छीमार नेते अमजद बोरकर, साखरीनाटेचे माजी सरपंच शाहद हबीब, मलिक गडकरी, फैयाज नलेकर, शोएब म्हसकर, संजय कुवेसकर, सौ. स्मीता नार्वेकर, ॲड. सुनिल मेस्त्री, ॲड.. समीर कुंटे, मुशरफ खलिफे आदींसह नागरीक उपस्थित होते.