सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७३ वा वार्षिक दीक्षांत समारंभ दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल)
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, १, नाथीबाई ठाकरसी मार्ग, चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या ७३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये विविध अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्येल्या विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल तथा कुलपती श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ श्री. रमेश बैस जी भूषवणार आहेत तर या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत.दीक्षांत समारंभाचे अभिभाषण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील करतील तर दीक्षांत समारंभाचे स्वागतपर भाषण व विद्यापीठाचा दीक्षांत अहवाल श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव सादर करतील.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ७३ वा वार्षिक दीक्षांत समारंभास बक्षीसपात्र व विद्यावाचस्पती (पीएच. डी.) विद्यार्थीनींनी दीक्षांत समारंभास व त्याच्या सरावासाठी निर्धारित वेशभूषेत दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ७३ वा दीक्षांत समारंभ यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. रुबी ओझा आणि कुलसचिव डॉ. विलास नांडवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
सदर दीक्षांत समारंभामध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयासहित जवळपास १३७४९ विद्यार्थिनींना १९३ विषयातील पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येतील. एकूण ४३ विद्यार्थिनीना विद्यावाचस्पती पदवी देण्यात येतील. तसेच परीक्षेमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या ७१ विद्यार्थिनींना सुवर्ण पदक, १ विद्यार्थिनींना रजत पदक, १ ट्रॉफी आणि १३३ विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभाची सविस्तर माहिती आणि सदर समारंभाच्या थेट वेबकास्टची लिंक विद्यापीठाच्या www.sndt.ac.in या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध होईल अशी माहिती डॉ. संजय नेरकर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी सांगितली.











