अखेर “वेंगुर्ले डच वखार” डागडुजी कामास प्रारंभ…

जुन्या आठवणींना मिळणार उजाळा

वेंगुर्ले | दाजी नाईक : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा उचललेल्या वेंगुर्ले कोट उर्फ किल्ले डच वखारिला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार आहे. दिवसेंदिवस या वास्तूची वाढती दुरावस्था लक्षात घेता जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेली दहा ते बारा वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिमा राबविल्या. तसेच दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पुरातत्व विभागामार्फत या डच वखारीच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूतील जुन्या आठवणींना आता उजाळा मिळणार आहे. असे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी सांगितले.

या डच वखार मधील प्रथम साफसफाई चे काम करून आता डागडुजी कामास कामगारांनी सुरुवात केली आहे. इ.स.१६३७ मध्ये आदिलशहा यांच्या कडून परवाना व योजना घेऊन इ.स.१६४१ पुर्वी या डच वखार किल्ल्याच बांधकाम करण्यात आले होते. वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार इ.स. १६६७ मध्ये दक्षिण कोकण मोहिम शिवरायांच्या ताब्यात आली होती. इ.स.२१ मार्च १६७५ मध्ये शिवरायाचे वेंगुर्ले येथे आगमन झाल्याची इतिहास नोंद सापडते. हा किल्ला इ.स.१६७७ डच यांच्या ताब्यात परत आला. तर इ.स. १६८३ मध्ये औरंगजेब यांच्या पुत्राने डच वखार लुटली होती. आणि इ.स. १६९६ डच व फ्रेंच यांच्यात वेंगुर्ले येथे चकमक झाली व

इ. स. १७०० मध्ये खेम सावंत यांचा वेंगुर्ले कोटचा ताबा घेतला.

नंतर इ.स. १८१२ सावंतवाडीच्या राणी यांनी इंग्रजांना वेंगुर्ले कोटचा ताबा दिला तर स्वातंत्र्यानंतर

म्हणजे इ.स.१९४७ नंतर सरकारी कार्यालये व पोलीस चौकीसाठी महाराष्ट्र शासनाने वापरलेली हि वास्तु इ.स. १९६३ पर्यंत शासकीय कार्यालयासाठी वापरण्यात आली व नंतर पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली.

नंतरच्या काळात लोकांनी लाकुड सामान विकुन फरशा चोरल्या व लोखंडी तोफा पळविल्या. अजुनही पहिला मजला व काही खोल्या सुस्थितीत असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोल्या असलेली हि एकमेव वास्तु आहे. सालाबाद येथे जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवित असुन वेळोवेळी किल्ले डच वखार संवर्धन व संरक्षण बाबतीत पुरातत्व विभागाला फक्त सुचनाच केल्या नाहीत तर रत्नागिरी येथे जाऊन या बाबतीत जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्र व्यवहार केला आहे.

दरम्यान या डच वखारीच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाल्याने या वास्तूला गतवैभव प्राप्त होणार आहे. शिवप्रेमिंच्या आनंदा बरोबरच पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे.