रोणापाल ग्रामस्थांचे उपोषण राजकीय आकसापोटी

देवाच्या नावाखाली विरोधकांकडून ग्रामपंचायतची नाहक बदनामी

रोणापाल सरपंच योगिता केणी यांचे प्रत्युत्तर

बांदा (प्रतिनिधी) :     रोणापाल ग्रामस्थांनी श्री देवी माऊली मंदिर परिसरातील विकासकामांचा भावनिक मुद्दा पुढे करून केवळ राजकीय आकसापोटी ग्रामपंचायतवर खोडसाळ आरोप केलेत. लोकांची दिशाभूल करून ग्रामपंचायत कार्यालयाकडे उपोषणास बसणे व उपोषणाला भेट दिली नाही म्हणून सरपंच यांचा निषेध करणे चुकीचे आहे. उपोषणकर्त्यांनी आधी शासन नियमांचा अभ्यास करणे गरजेचे होते, अशी टीका रोणापाल सरपंच योगिता केणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

 

त्या म्हणतात, रोणापाल गावातील श्री देवी माऊली मंदिर येथे विकास कामे झाली पाहिजेत अशी माझीही इच्छा आहे. परंतु श्री देवी माऊली मंदिर हे देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्याकडे नोंदणीकृत असून त्या अंतर्गत येणारी स्थानिक सल्लागार उपसमिती ह्या गावात स्थापन नाही. तसेच विकास कामे करावयाची जागा ग्रामपंचायत मालकीची नाही. त्यामुळे सदर कामाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायत कडून घेतली जाऊ शकत नाही. ग्रामपंचायत कडून ग्रामपंचायतच्या मालमत्तेवरच शासन निधी खर्च होणे आवश्यक आहे. अशी नियमात तरतूद आहे. हे जर १५ वर्षे सरपंच पद भुषवणारे प्रकाश गावडे यांना माहिती नसेल तर यावरून त्यांचे अज्ञान दिसून येते. तसेच सरपंच असताना माऊली मंदिराकडे तसेच गावात कोणती विकास कामे त्यांनी केली की फक्त टाईमपास करून कार्यकाल संपवला हे जनतेला त्यांनी सांगावे असे आव्हान दिले.

त्यांच्या कारकीर्दीत संमती पत्राच्या आधारे ग्रामपंचायत दप्तरी नोंद केलेल्या तळेवाडी रस्त्याला संबंधित जमीन मालकांनी न्यायालयात हरकत घेतलेली आहे. आणि त्याच ग्रामस्थांना घेऊन प्रकाश गावडे ग्रामपंचायत विरोधात उपोषणास बसले होते. मी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीचे अधिकार आणि प्रशासनाच्या कायदा चौकटीत बसूनच मी काम पाहते. सावंतवाडी गटविकास अधिकारी यांनी सदर विकास कामाची जागा ही ग्रामपंचायत मालकीची नसल्याने शासन निधी खर्च होऊ शकत नाही अशा आशयाचे पत्र संबंधित उपोषणकर्त्यांना दिले होते.

गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्षात भेट देऊन सुद्धा उपोषणकर्त्यांना हेच सांगितले. परंतु त्यांना ते मान्य नसल्यामुळे त्यांनी उपोषण चालूच ठेवले. गटविकास अधिकारी ग्रामपंचायत प्रशासनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप सरपंच सौ. केणी यांनी खोडून काढला. उपोषणाबाबतचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख यांना दिले होते. माझ्यावर राजकीय आकसापोटी आरोप केलेले असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या गावातील ८० टक्के ग्रामस्थ हे माझ्या व ग्रामपंचायत कार्यकारणी सोबतच आहेत हे उपोषणाच्या उपस्थिती वरुन दिसून येते. केवळ देवाच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करुन राजकीय आकसापोटी ग्रामपंचायत विरोधात उपोषणास झाले, आसा आरोप सौ. केणी यांनी केला आहे.

———–