रत्नागिरी : एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत रत्नागिरीमध्ये मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी 10 टक्के मराठा आरक्षण मंजूर झाल्याबद्दल शहरातील मारुती मंदिर येथे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
राज्यातील मराठा समाजाला शिक्षण, सरकारी नोकरी आणि निमसरकारी नोकरीत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक काल विधीमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर कोकणात मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठा म्हणून आरक्षण दिल्याबद्दल अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सरकारचे आभार मानले. बुधवारी सकाळी 10.30वा रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील चौकामध्ये मराठा समाजातील प्रमुख मंडळी एकत्र आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मारुती मंदिर येथील मंदिरात आशिर्वाद घेण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते व मराठा समाजातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व सुधाकरराव सावंत, केशवराव इंदूलकर, संतोष तावडे, राकेश नलावडे, प्राची शिंदे, नंदू चव्हाण, यांच्यासह मराठा समाजातील अनेक तरुण, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना केशवराव इंदूलकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व त्यांच्या मंत्रिमंडळाने मराठा म्हणून आरक्षण दिल्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानत असल्याचे सांगितले. यावेळी राकेश नलावडे यांनी सांगितले की गेली 40 ते 45 वर्ष मराठा समाजाची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ती आज पूर्ण झाली आहे. दहा टक्के आरक्षण मंजूर झाल्याबद्दल सरकारचे विशेष अभिनंदन करीत असल्याचे सांगितले. मराठा समाज म्हणून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार्यांचे विशेष अभिनंदन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे आरक्षण न्यायालयातही टिकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असून, त्याबद्दलही आपण सरकारचे अभिनंदन करीत आहोत. त्याचप्रमाणे मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार्या पदाधिकार्यांनाही धन्यवाद देत असल्याचे राकेश नलावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाबद्दल त्यांचे अभिनंदन, यापूर्वीचे आरक्षण न्यायालयात टिकले नव्हते. त्यानंतर मराठा समाज गप्प बसला नाही. आंदोलनाची दखल घेत 10 टक्के आरक्षण मिळाले त्याबद्दल विशेष अभिनंदन करतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे हे आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजाचा आग्रह आहे त्यांनी आता हट्ट थांबवावा. त्यानंतर पुढील दिशा ठरवावी. त्याचप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्यापासून काहीजणांनी विरोध सुरु केला आहे. त्यांना मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. सुधाकरराव सावंत,मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व कामगार नेते










