कारिवडे गोसावीवाडी येथे २३ रोजी सिद्धमहापुरूष भंडारा उत्सव

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकणामध्ये अनेक ठिकाणी नाथपंथी सिद्धमहापुरूष मठ आहेत. सालोबादप्रमाणे याठिकाणी भंडारा उत्सव होत असतो. मौजे कारिवडे गोसावीवाडी येथील सिद्धमहापुरूष हे एक जागृत देवस्थान मानले जाते. येथे शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी गोसावी नाथपंथी समाजाचा महापुरुष भंडारा उत्सव होत आहे. यावेळी कारिवडे गावची ग्रामदेवता श्री कालिका देवी आपल्या गावसलतानासह महापुरुषाच्या भेटीला येत असते. यावेळी गाव-हाटीनुसार देवीचे पालखी, निशाण आणि अवसरासहीत तरंग महापुरुष भेटीला येत असतात. यावेळी गावमानकरी व सारे भाविक उपस्थित राहून या देवभेटीच्या सोहळयाचा लाभ घेतात.

कारिवडे परिसरात सिद्धयोगी महापुरुषाचा हा प्राचीन मठ असून नाथपंथी समाजाची संस्कृती आणि परंपरा येथे जोपासली जाते. अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात नवनाथानी केलेल्या समाजजागृतीची आणि सांप्रदायिक भावनेची येथे प्रचिती येते. हा नाथपंथीय मठ डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात असून हे एक जागृत देवस्थान मानले जाते. इथल्या भंडा-यातील प्रसाद (सांदणी) सावंतवाडी येथील भोसलेराजे संस्थानाच्या राजवाड्यात देण्याचीही प्रथा आहे. राजसत्ता व पुरूमागाला जोडलेले हे देवस्थान आहे.

हा भंडारा उत्सव नाथपंथी परंपरेनुसार होत असतो. यावेळी विधीनुसार पूजा मांड घालून मंत्रतंत्र म्हणून घट स्थापीले जातात देवाचा नवस बोलून कोंबडा बळी देऊन रखवालीसाठी गाऱ्हाणे घातले जाते. कोकणची कलासंस्कृती म्हणून यावेळी ओटवणेकर नाट्य मंडळाचा दशावतारी नाटकाचा प्रयोग केला जातो. या भंडारा जत्रोत्सवासाठी कर्नाटक, गोवा व इतर अनेक भागातून भक्त भाविक उपस्थित राहतात. दोन दिवस हा उत्सव असतो. दुस-या दिवशी श्री कालिका देवी आपल्या सर्व गावसलतानासह माघारी आपल्या मंदीर स्थळाकडे जाते. असा अतुलनीय सोहळा म्हणजे भंडारा उत्सव. याचा आपण सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी यांनी केले आहे.