पत्रकार संदेश जिमन यांची निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाकडे मागणी
संगमेश्वर (प्रतिनिधी)कोकणातील दर्याखोर्यातील उंच पर्वत शिखरावर महादेवांची अनेक जागृत स्थाने आहेत. श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर, महाडमध्ये विरेश्वर, खेडमधील देवाचा डोंगर, गुहागरमध्ये वेळणेश्वर, संगमेश्वर-देवरूख येथील मार्लेश्वर, कसबा संगमेश्वरमधील कर्णेश्वर, देवगडमधील कुणकेश्वर या प्रसिद्ध स्थानांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठी शिव मंदिरे जागोजागी पहावयास मिळतात. शुक्रवार ८ मार्च, २०२४ रोजी महाशिवरात्रीचे व पुढे लागून असणाऱ्या शनिवार-रविवार सुट्टीचे औचित्य साधून कोकणातील बहुसंख्य ग्रामस्थ आपापल्या गावी जात आहेत. ६ मार्च, २०२४ पासून कोकण रेल्वेची प्रतिक्षा यादी ४०० पार दिसत आहे. या कालावधी कोकणात जाणार्यांची संख्या किती आहे आणि जादा गाड्या सोडणे किती गरजेचे व अनिवार्य आहे ते दिसून येत आहे.
२६ जानेवारी, २०२४ लाही लागून सुट्ट्या आल्यामुळे अशीच प्रतीक्षा यादी होती. परंतु, रेल्वे प्रशासनाने त्याची वेळीच दखल न घेतल्यामुळे जादा गाड्या सोडण्यात आल्या नाहीत व सर्वच गाड्यांना अभूतपूर्व गर्दी उसळली होती. त्यामुळे त्यातून धडा घेऊन यावेळी जादा गाड्या गाड्या सोडणे आवश्यक आहे.
निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी या विषयी पुढाकार घेतला असून शुक्रवारी महाशिवरात्र व शनिवार-रविवार या सलग सुट्ट्यांमुळे होणार्या तुफान गर्दीवर उपाय म्हणून दि. ७ ते १० मार्च, २०२४ या कालावधीत मुंबई ते सावंतवाडी या मार्गावर विशेष गाड्या सोडाव्या यासाठी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे महामंडळ संजय गुप्ता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.










