भाजप महिला आघाडीच्या प्रयत्नांमुळे फसवणूक झालेल्या महिलेला कंपनीकडून पाच लाख परत
गृहखाते किंवा पोलिसांना दोष देण्यापेक्षा जनतेने सतर्क राहणे गरजेचे
सावंतवाडी । प्रतिनिधी : अधिक व्याजदर तसेच दाम दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आज अनेक संस्था गोरगरीब लोकांना लुबाडत असल्याचे प्रकार दररोज निदर्शनास येत आहेत. अशावेळी गृह खात्याला किंवा पोलिसांना जबाबदार धरण्यापेक्षा आपणच सतर्क राहून अधिकृत बँका तसेच पोस्टामध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडल महिला अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर यांनी केले.
सावंतवाडीतील एका महिलेची तब्बल अकरा लाख रुपयांची फसवणूक अशाच एका संस्थेकडून झाली होती. त्या महिलेला सावंतवाडीच्या तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्या माध्यमातून मोहिनी मडगावकर व भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यातील ५ लाख रुपये परत मिळवून दिले. उर्वरित रक्कम देखील परत देण्याची हमी सदर संस्थेकडून घेण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी मिसबा शेख, साक्षी गवस, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर, अर्चना खोबरेकर आदी उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाम दुप्पट रक्कम करून देतो असे सांगून अनेक जण सर्वसामान्य गरीब लोकांना फसवत आहेत. आजपर्यंत अनेक कंपन्यांनी येथील लोकांचे कष्टाचे पैसे घेऊन पलायन केले आहे. लोक अशा आमिषाला बळी का पडतात असा सवाल करताना लोकांनीच आता सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीतील एक सर्वसामान्य महिला कुटुंब अकरा लाख रुपयाला फसली होती. या महिलेच्या कुटुंबीयाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आम्ही प्रयत्न केले. सावंतवाडीच्या तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्याकडे त्याबाबतची तक्रार केल्यानंतर त्यांनी संबंधित भामट्या व्यक्तींचा शोध घेऊन तिला न्याय मिळवून दिला. सदर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने पहिल्या हप्त्यात पाच लाख रुपये दिले आहेत तर उर्वरित रक्कम दिली जाणार असल्याचे आश्वासन सदर कंपनीने दिली आहे.
या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये पोलिसांना दोष देणे योग्य नाही. पोलीस दक्षतेने काम करत आहेत. नेहमी पोलीस आवाहन करत आहेत की अशा आमिषाला बळी पडू नका. मात्र, सर्वसामान्य लोक आमिषाला वारंवार बळी पडत आहेत. लोकांनी किसान विकास अथवा एफ डी मध्ये आपले पैसे गुंतवावेत असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आर्थिक फसवणूक झालेल्या खोबरेकर म्हणाल्या, पोलिसांचे सहकार्य आणि मोहिनी मडगावकर यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. आमिषाला बळी पडून आमची फसवणूक झाली मात्र, अन्य लोकांनी अशा आमिषाला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.












