लांजा( प्रतिनिधी) शहरातील लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा मर्यादित पोस्ट कार्ड लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून कथालेखन स्पर्धेत सौ.सविता राजेश माळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
लांजा -नवोदित व उदयोन्मुख साहित्यिकांना प्रोत्साहित करण्याचे दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सौ.सविता राजेश माळी , लांजा यांच्या सोपान या कथेला प्रथम क्रमांक मिळाला असून प्रा.वर्षा शिरीष फाटक, देवरुख यांच्या नुरजहा या कथेस द्वितीय क्रमांक, दिलीप शंकर चव्हाण वेरवली-लांजा यांच्या माहेरपण या कथेला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ क्रमांक मनोज वसंत भागवत लांजा यांची सर्टिफिकेट्स आणि कु.तनुजा संतोष प्रभुदेसाई यांचे फिटे अंधाराचे जाळे या कथांना मिळाला आहे .
पोस्ट कार्ड लेखन स्पर्धेत कु.सादिया जावेद नाकाडे हिने प्रथम क्रमांक , कु. सृष्टी प्रदीप पांचाळ हिने द्वितीय क्रमांक आणि कु.श्रद्धा शरद सुतार हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून दत्तात्रय देसाई ,वाचनालयाच्या संचालिका सौ.ललिता भिंगे व सौ.डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवारी, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राजभाषा दिन अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ठीक १०.३० वाजता कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रमास सर्व स्पर्धक, वाचनालयाचे सभासद, वाचक, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकमान्य वाचनालय लांजाचे अध्यक्ष ॲड.अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे.












