उरुसात जाऊन भानगडी करू नका सांगितल्याचा राग; एकाला 11 जणांची मारहाण

रत्नागिरी | प्रतिनिधी  : तालुक्यातील सोमेश्वर येथे दोघांना पिर यात्रा (उरुस) हा आपल्या गावाचा आहे. तुम्ही तेथे जाउन भानगडी करु नका असे सांगितल्याच्या रागातून एकाला 11 जणांनी बेदम मारहाण केली. यात चार महिलांचा समावेश असनू ही घटना शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.45 वा. घडली.निसार हुशये, आसिफ साखरकर, बशीर साखरकर, आरमान नाईक, तैरीण नाईक, तेहसीन हुशये, यास्मीन साखरकर, अबिदा फणसोपकर, शाहिद हुशये, इकबाल साखरकर, इमरान नाईक (सर्व रा.सोमेश्वर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 11 संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात वसीम अब्दुल मजीद वस्ता (रा.सोमेश्वर,रत्नागिरी) यांनी शनिवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवार 21 फेब्रुवारी रोजी वसीम वस्ता यांनी संशयित आरोपींपैकी बशीर साखरकर आणि आसिफ साखरकर या दोघांना पिर यात्रा आपल्या गावाचा आहे. तुम्ही तेथे जावून भानगडी करु नका असे सांगितले होते. या गोष्टीचा राग संशयितांनी आपल्या मनात ठेवला होता.

दरम्यान, शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.45 वा. वसीम वस्ता आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी सोमेश्वर बस स्टॉप येथे गेले असताना संशयित 11 जणांनी तिथे येउन त्यांना शिवीगाळ करत स्टील रॉड, प्लॅस्टिक पाईप, लोखंडी हत्यार आणि हातांच्या ठोशांनी बेदम मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 324, 323, 504, 506, 427, 141, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.