नमन, जाखडी कलावंतांच्या मानधन मागणीचे केले स्वागत

Google search engine
Google search engine

आ. निकम यांचे चिपळूण ता. नमन भा. लो. मंडळाचे प्रवक्ता संतोष कुळे यांनी मानले आभार

चिपळूण | वार्ताहर : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर ते मे महिन्याच्या दरम्यान नमन ही लोककला सादर केली जाते. त्याचबरोबर जून ते नोव्हेंबर पर्यंत जाखडी लोककला सादर होते. मात्र या लोककलांना शासन दरबारी राजाश्रय नसल्यामुळे या कोकणातील लोककला आणि कलावंत सेवा सुविधांपासून वंचित राहिले आहेत . या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आ. शेखर निकम यांनी नमन व जाखडी कलाकारांना मानधन द्यावे, या बाबीकडे लक्ष वेधले .त्याबद्दल चिपळूण ता. नमन भारुड लोककला मंडळाचे मुख्य प्रवक्ता आणि कुणबी युवा चिपळूण तालुकाध्यक्ष संतोष (भाई) कुळे यांनी आ. निकम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वी चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम यांना मंडळाच्या वतीने नमन लोककलेचा महाराष्ट्राच्या लोककला प्रकारात नोंद व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते. गाव विकासाबरोबरच सांस्कृतिक कलेचा विकास व्हावा आणि कलाकार यांना मानधन मिळावे यासाठी आ. निकम प्रयत्नशील आहेत. हाच धागा पकडत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाबाहेर आमदार शेखर निकम यांनी फलक हातात घेत नमन जाखडी कलेला राजाश्रय मिळावा आणि कलावंतांना मानधन मिळावा या मागणीसाठी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले . त्याबद्दल चिपळूण नमन मंडळाच्या वतीने आ. निकम यांचे संतोष कुळे आणि सहकारी यांनी आभार मानले. खर तर कोकणामध्ये ज्या विविध लोककला लोक कलावंत जपत आहेत. त्यामधील नमन जाखडी, भारुड, गोंधळ आणि जलसा या लोककला आहेत. त्यापैकी नमन या लोककलेचे मोठ्या प्रमाणात सर्वत्र सादरीकरण केले जाते. मात्र नमन लोककलेचा महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये समावेश नसल्यामुळे शासनाच्या सेवा सुविधांपासून या कलावंतांना वंचित राहावे लागते. शासन दरबारी या नमन कलेची नोंद व्हावी आणि इतर लोककला प्रमाणे यांना अनुदान प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लोककला ही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवते .सण उत्सव या मध्ये लोककलेतून जनजागृती आणि प्रबोधन करताना मनोरंजन सुद्धा केले जाते. मात्र, हा मनोरंजन करणारा कलावंत आजही उपेक्षित राहिलेला आहे. त्याच्या पदरात काहीच पडलेले नाही. दिवसभर काम करायचे आणि रात्री मनोरंजन म्हणून नमन सादर करायचे.

पुन्हा सकाळी आपल्या नेहमीच्या कामावरती जायचे, असे नित्यनेमाने नमन मंडळे कला सादर करताना करत आहेत. मात्र यांची दखल शासन दरबारी आजही घेतली गेली नाही. त्यामुळेच आ. शेखर निकम यांनी नमन जाखडी लोककलावंताना मानधन देण्याची मागणी केलेली आहे. या मागणीची लवकर पूर्तता व्हावी अशीच सर्व नमन मंडळाची मागणी आहे. चिपळूण तालुका नमन भारुड लोककला मंडळाचे मुख्य प्रवक्ता संतोष कुळे, अध्यक्ष भिकाजी भुवड, सचिव संजय भागडे, खजिनदार तानाजी गुडेकर व सर्व पदाधिकारी आणि नमन मंडळांनी आ. शेखर निकम यांचे आभार मानले आहेत. ही मागणी पूर्णत्वास जाण्यासाठी आ. निकम यांनी पाठपुरावा करावा अशी सदिच्छा इच्छा व्यक्त केलेली आहे.