काताळे ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीमध्ये भाजपाचा ठाकरे गटाला दे धक्का

Google search engine
Google search engine

जागतिक महीला दिनी प्रियांका सुर्वे सरपंच पदी विराजमान.

दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीने भाजपाचा 6 – 3 असा केला होता पराभव

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील तवसाळ, तवसाळ खुर्द,कातळे या तीन महसुल गावांचा समावेश असणा-या कातळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 साली झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारत भारतीय जनता पार्टीच्या प्रियांका सुर्वे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत सरपंच पद राष्ट्रवादीला मिळवून देणारे तत्कालीन जिल्हा सर चिटणीस विजय मोहिते यांनी काही दिवसापूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट बाजी मारणार अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाची सल कायम होती. त्या पराभवाची परतफेड करण्याची निर्माण झालेली संधी निलेश सुर्वे यांनी योग्य उपयोगात आणत अतिशय संयमी आणि शांतपणे दोन वर्षांपूर्वी पराभूत झालेल्या आपल्या पत्नीला प्रियांका सुर्वे यांना सरपंच पदी विराजमान केले. महाविकास आघाडीकडे नऊपैकी सहा जागा असतानाही प्रियांका सुर्वे यांना 5 मत मिळाली, एक मत बाद झाले तर महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रावणी नाचरे याना फक्त 3 मते मिळाली.

प्रियांका सुर्वे यांना मिळालेली अधिकची 2 मते कोणाची ? बाद झालेले मत कोणाचे ? आणि बाद झालेले मत हे मुद्दाम बाद करायला लावले का ? याची जोरदार चर्चा तवसाळ कातळे पंचक्रोशी मध्ये सुरू आहे. महिला दिनाच्या आणि तवसाळ पंचक्रोशीची ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगा उत्सवाच्या दिवशी प्रियंका सुर्वे यांचा अनपेक्षित पणे झालेला विजय हा पंचक्रोशीमध्ये जसा चर्चेचा ठरत आहे तसेच वाणिज्य पदवीधर व डीएड धारक असणाऱ्या या उच्चशिक्षित महिलेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना एकत्रित ठेवण्यात आलेले यश ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर विजय मोहिते यांना टिकवता आले नसल्याची चर्चाही पंचक्रोशीत रंगत आहे.

मी भाजप तालुका अध्यक्षांची पत्नी म्हणून भाजपाची सदस्य नसून माझे माहेरचे (कोंडकारुळ) घराणे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे. मी भारतीय जनता पार्टीची सदस्य असले तरी आत्ता सरपंच म्हणून जो कार्यभार स्वीकारला आहे तो तीन महसूल गावांची मिळून निर्माण झालेल्या कातळे ग्रामपंचायतीचा आहे. त्यामुळे मी सरपंच ही काताळे ग्रामपंचायतीची आहे. माझ्या शिक्षणाचा जेवढा फायदा ग्रामपंचाय कार्यक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, केंद्राच्या – राज्याच्या योजना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी, पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी मला कसा करून घेता येईल याकडे मी जास्त लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांनी सांगितले आहे