भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांचा भाजप प्रवेश
भाजपा प्रदेश महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व लोकसभा संयोजक पदी चित्रा चव्हाण यांची निवड
भाजप महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, अनिकेत कानडे यांचे विशेष कौतुक!
चिपळूण (प्रतिनिधी):– भाजप पक्ष हा परिवार आहे. या परिवारात प्रत्येकाचा सन्मान केला जातो. हा शब्द भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा चव्हाण यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांना आपण दिला आहे. तुम्ही सर्व भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून आल्या आहात. तुम्हा सर्व महिलांना सन्मान देऊ, असा विश्वास भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिपळूणमध्ये नारी शक्ती वंदन मेळाव्याप्रसंगी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांनी आपल्या समर्थक महिला पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. तर लगेच चित्रा चव्हाण यांची भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा व लोकसभा संयोजक पदाच्या निवडीची घोषणा केली.
हा कार्यक्रम चितळे मंगल कार्यालयात झाला. यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे चिपळूणमध्ये आगमन होताच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी महिला पदाधिकाऱयांसमवेत जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यानंतर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी माजी जिल्हाध्यक्ष सौ. चित्रा चव्हाण, काँग्रेसच्या श्रद्धा कदम, राधिका लवेकर, सौ. रसिका काजारी आदी महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांचे भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे तसेच महिला मोर्चा पदाधिकारी महिलांनी या सर्वांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस चित्रा चव्हाण यांच्यासह काही महिला पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. तसेच भाजप पक्ष वाढी विषयी आपली भूमिका मांडली.
तर भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजप परिवार आहे. या परिवारामध्ये तुमचा सर्वांचा सन्मान केला जाईल. तुम्ही जेव्हा चांगलं काम करीत असता तेव्हा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपल्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेते नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांसारखे नेते आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास दिला. विशेष म्हणजे चित्रा वाघ यांनी उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांचे पक्षाविषयीच्या योगदानाबद्दल कौतुक केले. तर त्यांनी पुढे भाजप पक्ष वाढीविषयी महिलांना मार्गदर्शन केले.
भाजप प्रवेशकर्त्या चित्रा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात गेली ३० वर्षे राजकारणात कार्यरत आहे. कुटूंबाची समर्थ साथ मिळत आहे. आज भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नेते नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सक्रिय होत आहे. राजकारणात चांगलं काम करीत महिला पुढे जात असताना तिला त्रास दिला जातो, हे आपण अनुभवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आपले दैवत आहेत. पुढेही ते दैवत राहतील. महिलांना सक्षम करण्यासाठी भाजपमध्ये आली आहे. आम्ही पक्ष वाढविण्यासाठी प्रमाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी श्रद्धा कदम यांनी देखील आपले मनोगत मांडले. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा पदाधिकारी मंजुषा कुद्रीयोती, प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, अर्चना देसाई, नम्रता निमुनकर, नीलम गोंधळी, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, माजी नगरसेवक विजय चितळे, प्रवीण कांबळी, शहर मंडल अधिकारी श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक आशिष खातू, परिमल भोसले, रत्नदीप देवळेकर, अनिल सावर्डेकर, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संदीप भिसे, महेश कांबळी, अमित चिपळूणकर, सोनल कारेकर, भाजप खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, पूर्वा पाटकर, विशाखा चांदे, स्मिता पालांडे, जयवंती सवणे, प्राजक्ता मुंडेकर, शुभांगी बुरबंडकर, उर्मिला कदम, संख्या पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार कदम यांनी केले.











