सिंधुदुर्गचे माणिकमोती : डाॕ.बाळकृष्ण लळीत.

————————————-
श्रावणामधलो भिजलो साकव इन्द्रधनुष्याचो ।
वलव वलव गो वल्याक हात लाव तुज्या जिवाळयाचो ।।
खडपावयल्यान् पदर ढाळता आमलीचो झेलो
खुळावलेलो निम्बांवयलो उडता थय कावळो
दोम्पारा गो पडात माज्या जाळयाचो फासो
त्या फाशात्सून मेळात माका सोन्याचो मासो
खोपटावयल्यान् परमाळता बग वास बांगडयाचो
वलव वल यलगो वल्याक हात लाव तुज्या जिवाळयाचो ।
वल्याक सम् सप्, पान्याक धप् धप् मनात गो हुरहुर मार्गेसरुतल्यान् खोपटात आयकूक येतलो तिसरो सूर
तुजे डवाळे भादव्यातले पुरवित माझी होडी
चंदेरी समिदरात्सून आमची शोभात गो जोडी
बग गो थकडेन् वाकूक लागलो भार आडसराचो
वलय वलव गो वल्याक हात लाव तुज्या जिवाळयाचो ।।
आरती मासिकात १९८६ साली प्रकाशित झालेली
विद्याधर भागवत यांची ही मालवणी कविता म्हणजे ते या लालमातीशी किती जवळिक साधून होते यांचे उदाहरण होय.
++
.१९७७-७८ साल असावे माझे वडील मला व आईला कुडासे येथे ‘झुलता पुल’ पहायला घेऊन गेले होते.त्यावेळी समजले की, तेथे विद्याधर भागवत रहातात. आम्ही चौकशी करीत एका रस्तालगतच्या चिरेबंदी घरात गेलो.तर भागवत सर तेथेच होते. सोनेरी फ्रेमचा चष्मा ..सहज साधे पण लाघवी बोलणे..आपलं म्हणणे दुसऱ्याला समजेल से संवाद.
सावंतवाडी परिसरात नोकरी गट शिक्षणाधिकारी पदावर असणाऱ्या त्यांच्या पत्नी उषाताई तेथे त्यादिवशी होत्या. माझ्या आईच्या त्या आतेबहिण होत्या.त्यामुळे आई नि उषाताई वालावलीच्या आणि भाऊ टेंगशे यांच्या आठवणीत लगेचच रमुन गेल्या…माझे आजोबा अनंत माजगावकर यांच्या बहिणचा विवाह भाऊ टेंगशे यांच्याशी झाला होता.भाऊंची कन्या म्हणजे उषाताई.. ! म्हणून
उषाताई भेटल्या की,आम्ही त्याना मावशी या हक्काच्या नात्याने हाक मारत असू.
उषा मावशीने शिक्षक , मुख्याध्यापक,साहित्यिक असलेल्या भागवत सरांचा संसार अत्यंत समाधानाने व स्वागतशील वृत्तीने केला.एवढेच नव्हे ‘आरती’ चे संपादन व चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था कारभारात उत्तम सहकार्य केले…!कसालला आम्ही मालवणी बोली संमेलन … भरवले तेव्हा परिसराला ‘कै. विद्याधर भागवत नगरी ‘असे नाव दिले होते.तेव्हा सरांचा फोटो हवा होता.तो त्यानी स्वतः आणला होता.भागवत सरांनी लिहायला थोडी उशिरा सुरवात केली असली तर दर्जेदार लेखन विशेषतः चरित्रपर कादंबरी लेखन करून साहित्यिक म्हणून महत्त्वाचे कार्य केले मितभाषी असलेले भागवत सर लेखनात खूप छान मुक्तसंवाद साधत असत.
++
शिक्षक मुख्याध्यापक म्हणून १९६८ ते १९७९पर्यंत कुडासे येथे माध्यमिक विद्यालयात
नंतर १९८२पर्यंत भेडशी आणि जून ८२ते ८४ मडूरा येथे कार्यरत होते..आणि ८४पासून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन ते सावंतवाडी येथे वास्तव्याला आले.
२००८ साली ‘आरती’ मासिकाने सरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा एक विशेषांक प्रकाशित केला.
++
सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ तालुक्यातील वालावल या निसर्गसंपन्न गावामध्ये २७ ऑगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला. त्या काळातील सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली चेंदवण, पाट या गावामध्ये त्यांचे वडील गंगाधर चिंतामण भागवत हे प्राथमिक शिक्षक होते.वडिलांच्या आदर्श संस्कारामुळे विद्याधर यांनी साहित्यक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केला.एक कादंबरीकार, लेखक, कवी म्हणून उदयास आले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन नावारुपास आले.
++
त्यांचे प्राथमिक शिक्षण कुडाळ तालुक्यातील वालावल येथे तर माध्यमिक शिक्षण मालवण, शिरोडा, सावंतवाडी येथे झाले.
त्यांच्या संस्कारक्षम मनावर अनेक शिक्षकांनी ज्ञानदान केले ते उच्चशिक्षणासाठी कोल्हापूर येथे गेले. मराठी व संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी घेतली.त्या ठिकाणी भाऊसाहेब खांडेकर यांचे सानिध्य त्यांना लाभले. साहित्याची आवड निर्माण होवू लागली.पुढे बी.एड.करून ते शिक्षक झाले.त्यांच्या विषयी माहिती उपलब्ध झाली ती अशी-
“सावंतवाडी तालुक्यातील भेडशी,कुडासे,मडुराअशा अत्यंत दुर्गम डोंगराळ आणि अत्यंत अडचणीच्या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केले. त्या ठिकाणच्या विद्यार्थ्याच्या, गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेवून नेहमी मदत केली. त्यांनी दक्षिण कोकणच्या दुर्गम भागात केलेले शैक्षणिक कार्य हे महत्त्वाचे आहे.जीवनामध्ये सतत कृतिशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष होता..विद्याधर भागवत यांचा पिंड शिक्षकाचा होता. त्यामुळे ज्ञान मिळविणे व त्या ज्ञानाचा इतर विद्यार्थ्यांना फायदा करून देणे. अध्यापनाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा करून देणे. अध्यापनाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील सुखदुःखाशी समरस होणे. होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणारा खंड त्यांनी आपल्यापरिने सोडवण्याचा प्रयत्न केला.अनेक विद्यार्थ्यांवर वाङ्मयीन संस्कार केले व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणुन नावारुपास आले. शैक्षणिक कार्यात शिक्षक, मुख्याध्यापक आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून भागवत यांनी काम केले. ज्या गावात नोकरी केली.त्या गावाच्या विकासाठी ते सतत कार्यशील राहीले.गावामध्ये एस.टी बस आणण्यापासून ग्रामस्थांच्या वैयक्तिक अडचणीत त्यांना मदत करण्यापर्यत त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.शिक्षक म्हणुन काम करत असताना जवळपास ३५ गावांचा विजेचा प्रश्न त्यांनी सरकार दरबारी पूर्ण करुन त्यासाठी लागणारी आर्थिक मदत त्यांनी स्वतःच्या खिशातून केली.अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांनी मदत केली
++
*लेखन प्रारंभ-*
“दक्षिण कोकणच्या दुर्गम भागात राहून त्यांनी आपल्या साहित्य प्रवासाला कवितेने सुरुवात केली.विशेष म्हणजे भागवत यांच्या ‘सागरवेला’ या कवितासंग्रहाला प्रस्तावना कविवर्य कुसुमाग्रज आणि वि.स. खांडेकर या दिग्गज लेखकांची लाभली आहे.समुद्राबद्दलची निस्सीम ओढ आणि भावबंध भागवत यांच्या अनेक कवितामधून डोकावतो.
भागवत यांच्या प्रतिभेची कादंबरीकाराची होती .त्यात चरित्रात्मक कादंबरी लिहिण्याकडे त्यांचा ओढा जास्त होता. ‘प्रस्थान योगी’, ‘ऐलतटावर पैलतटावर’ व ‘जखमी पंख’ या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच ‘गौरी’, ‘वेलवाडी’, ‘ओथंबलेले आभाळ’, ‘ती कधी कळलीच नाही’या व इतर स्वतंत्र विषयावरील कादंबऱ्या आहेत. त्यामध्ये प्रादेशिक बोलीचा वापर करून कोकणी जीवनातील सामाजिक अंतरंगातील
ध्येयवाद कादंबरीतून डोकावताना दिसतो.”
त्यांनी ‘चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले विशेष म्हणजे ही संस्था लेखक मंडळीची सहकारी तत्त्वावर चालणारी महाराष्ट्रातील पहिलीच संस्था होय. या संस्थेच्यावतीने नवोदितासाठी विविध विषयावरची ५० च्यावर पुस्तके प्रकाशित करण्यात आली.यातील काही पुस्तकांना पुरस्कारही मिळाले, ‘आरती’ या वाङ्मयीनदृष्टया दर्जेदार मासिकाचे प्रमुख संपादन केले. हे आजही अविरतपणे सुरू आहे.
विद्याधर भागवत यांनी नवोदित लेखकासाठी मार्गदर्शनात्मक कथा,काव्य,कृतिसत्रे,शिबिरे आयोजित केली. ते ‘सत्यकथे’मधुन लिहित होते. साहित्य,संस्था,प्रकाशक,लेखक आणि वाचक यांच्यामध्ये एक सुसंवाद घडावा आणि साहित्यविषयक चळवळ पुढे यावी या इच्छेने भागवत आयुष्यभर धडपडत राहिले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत भागवत यांचा मोलाचा वाटा होता. या परिषदेवर काही वर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. नंतर तीन वर्षे संपुर्ण कोकण विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी याचे उपकार्याध्यक्ष म्हणून काम केले.विद्याधर भागवत यांनी मराठी वाङ्मयात जे योगदान दिलेले आहे.त्यांनी जी साहित्य संपदा निर्माण केली. ती नक्कीच वाचकाला, अभ्यासकाला साहित्याविषयक आवड निर्माण करते.त्यांचे हे वाङ्मयीन कार्य सुजाण माणसामध्ये वाङ्मयीन आस्था निर्माण करणारे आहे. तसेच उत्तम साहित्य निर्मिती करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तेजन देणार आहे.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील नामवंत साहित्यिकांचे रत्नागिरी जिल्हा कवी मित्रमंडळात आरती प्रभू, व आ.ना. पेडणेकर,मधु मंगेश कर्णिक, वसंत सावंत, गु.मा.आंबेसकर,श्री सरमळकर, व हरिहर आठलेकर आदि साहित्यिक एकत्रित येऊन कविता वाचन करणे,चर्चा करणे, संमेलन घेणे असे कार्यक्रम केले जात होते.त्यातुनच डॉ.वसंत सावंत, मधु मंगेश कर्णिक,विद्याधर भागवत यांच्यासारखे लेखक निर्माण झाले,या मंडळामुळे भागवत यांना मराठी साहित्याची व कविता करण्याची आवड व छंद लागला. (संदर्भ आरती २००८)एकूणच विद्याधर भागवत यांची वाङ्मयीन जडणघडण निसर्गसंपन्न अशा परिसरामध्ये झाली, महान लेखकांचा सहवास तरुण वयात त्यांना लाभला त्यामुळे ते साहित्य निर्मिती करु लागले.
++
साहित्य संपदा-
त्यांच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा आरती मासिकातील एका लेखात घेण्यात आला आहेतो असा-
” विद्याधर भागवत यांनी कविता, कादंबरी, ललितलेख, कथा, बाल वाङ्मय या प्रकारामध्ये लेखन केले. दक्षिण कोकणच्या दुर्गम भागात शैक्षणिक सामाजिक कार्य करीत असताना भागवत यांची साहित्य साधना सुरू होती, कोकणच्या संपन्न निसर्गाची प्रेरणेने कलावंतांच्या मनातील कवितेला प्रारंभ केला, या कालखंडात अनेक कवी, लेखक, साहित्यिक मित्रांशी भागवत यांची मैत्री जमली.मराठी साहित्यितील कविता ते सत्यकथा,छंद,मनोहर इ. मासिकातून व दैनिकातून कथा,कविता,ललितलेख सतत लिहित गेले.पणजी,रत्नागिरी, पुणे आकाशवाणीवर भगवत यांनी कविता वाचन केले. त्यामध्ये चिंतन या कार्यक्रमात रत्नागिरी आकाशवाणीवर भागवत यांना विचार प्रकट करण्याची संधी मिळाली.विद्याधर भागवत यांनी कविता, कादंबरी, ललित लेखन,कथा,बालवाङ्मय, एकांकिका या वाड्मय प्रकारात लेखन केले त्यामध्ये त्यांनी प्रथम कवितेला प्रारंभ केला. १९५८ मध्ये ‘सागरवेळा’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा कवितासंग्रह प्रकाशित करून भागवत यांनी मराठी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. ‘सागरवेळा’वर प्रतिक्रिया देताना कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, “कित्येक गवयाप्रमाणे कित्येक कवींनाही आपला सुर चटकन आणि विनासायास सापडतो आणि यावर आधारलेली विविध स्वरांची आंदोलन रसिकांचे मन आल्हादित करतात भागवत यांच्याकडे हे सामर्थ्य आहे.” (संदर्भ- ‘आरती’ मासिक
२००३)सागरवेळा’ या कवितासंग्रहातील कविता उमेदीच्या काळातील आहेत. बालकवी,बोरकर,कुसुमाग्रज, इंदिरा संत यांच्या कवितेचे संस्कार आणणारी लय ताल मात्रावृत्ते पेलणारी भागवत यांची कविता आहे. ‘सागरखेला’ च्या समकालीन कवितेते आणि तत्पुर्वीही बहुधा निसर्ग आणि प्रिती या दोन गोष्टींना कवितेमध्ये महत्त्वाचे स्थान होते. परंतु त्यांच्या कवितेत केवळ निसर्ग कविता वेगळ्या,प्रेम कविता वेगळ्या, असे दिसत नाही, त्यांच्या प्रेम कवितेत निसर्ग हा जिवलग मित्राची भूमिका निभावताना दिसतो.त्यामुळे निसर्गप्रेम आणि कवीच्या मनानी भावस्थिती याना तिहेरी गोफ त्यांच्या कवितेतून दृष्टिस पडतो.
“कोकणातला समुद्र,डोंगर, झाडे, मोठे आकाश,माती,तिळफुले हे सारे त्यांच्या कवितेचं एक अंग बनते.भागवतांच्या काही कविता चिंतनाचा एक भागा पकडून आत्मशोध घेताना दिसतात, केळफुलातील मौन शहाळे, शकून, पुळणीवरची फेनफुले, अळवावरचा लाजरा जर, हळवा थेंब,चिन्यातुन स्त्रवणाऱ्या ओशट व्यथा,तुडुंब भरलेले डोळयाचे तळे, गात्रातल्या पावसाचा मल्हार,नदीच्या काठाने बगळयांच्या टिकल्या,नागमोडी पायवाट वरून चालणारी स्वप्ने अशा सारख्या काव्य प्रतिमातून कोकणातल्या भूमीशी निसर्गाशी तादात्म्य पावलेले कविमन जाणवते.”
‘सागरवेळा’ या कवितासंग्रहापेक्षा ‘कवितेच्या कविता’ या कवितासंग्रहाने आत्मशोधाचे प्रमाण सहाजिकचे वाढलेले दिसते. वास्तवदर्शी भावाशय व्यक्त करणाऱ्या ‘मी तुकाराम वाचतो तेव्हा, प्राण्यांना लाल निखारा’, ‘मुठभर प्रकाश पुत्रांनी’, ‘माझी शरीर यात्रा’, ‘ताई ताई सांग मला’ या सारख्या कविता भागवत यांची सामाजिक घटीताला प्रतिक्रिया देणारी मनोवृत्ती जागवून देतात.जीवनमूल्य विषयक सनातन प्रश्न नियतीची कुर वेष्टेन सामाजिक नैतिक मुल्यांचा हास अशा सुत्रांच्या अंगाने त्यांच्या अलिकडच्या कविता त्यांच्या संवेदनाक्षम समाजभावाचे दर्शन घडवतात स्वभावत च त्यांची प्रतिभा निखळ कलावादी सौदर्यलोलुप आत्मनिमग्न अशी आहे. विशुध्द भावकवितेच्या अंगानेच भागवत यांची कविता विकसित होत गेलेली दिसते.” असे अभ्यासकानी नोंदवले आहे.
विद्याधर भागवत यांनी प्रस्थान, योगी’ ऐलतटावर पैलतटावर, जखमी पंख या चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या त्यांचा चरित्रात्मक कादंबरी लिहिण्याकडे जास्त ओढा होता. या कामातून महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक जीवनातील नामवंताचा वेध सर्जनशील शैलीने मांडलेला आहे. चरित्रकार हा मुख्यतः सर्जक असतो.चरित्रनायकाच्या काही एक सत्यता विजेरीच्या झोताप्रमाणे उजळून टाकण्याचे कसब व आव्हान भागवत यांनी
संशोधक व सर्जक या दुहेरी नात्याने प्रयोगक्षम चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या.
‘प्रस्थान व योगी’ या चरित्रात्मक कादंबरीमध्ये वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनाचा आलेख उलगडवून दाखवला आहे ‘प्रस्थान’ व ‘योगी’ या दोन स्वतंत्र कादंबऱ्या असून प्रस्थान मध्ये वासुदेवानंद सरस्वती यांच्या जीवनातील पुर्वाधावर प्रकाश टाकला आहे, तर ‘योगी’ मध्ये जीवनातील उत्तरार्धाचे चित्रण केले आहे.ही कादंबरी केवळ स्वामींचा जीवनलेख न होता ती टेंबेस्वामी व सभोवतालच्या समाज व मानवी विश्व त्या विश्वातील व्यथा, कथा, बेदना, संवेदना, वृत्ती, प्रवृत्ती यांचे सौंदर्यपूर्ण दर्शन घडविणारी ही
कलाकृती आहे.
‘ऐलतटावर पैलतटावर’ या कादंबरीमध्ये विद्याधर भागवत यांनी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जीवनाचा कल्पक वेध घेऊन त्यांच्या अंतरंगातील भावावस्था टिपण्याचा सजग प्रयत्न या दुसऱ्या कादंबरीमध्ये केला आहे. बालकवींची नैसर्गिक प्रतिभा, निसर्गप्रेम त्यांची नादमय शब्दकळा उपमा, उत्प्रेच्चा याचा वापर, भांडार एकिकडे व दुसरीकडे त्यांचे शोषण करणारे कुटुंब आहे. बालकवींचा मोठा भाऊ अमृत, आई पत्नीला भोगावे लागणारे व्यचाभोग त्यांच्यातील विविध ताण त्यातून बालकवींची होत जाणारी कोंडी, गुदमरून जाणारा एक भाव कोवळा जीव,विद्याधर भागवत समरसतेने मांडतात.यानंतर ‘जखमी पंख’ ही कादंबरी भागवत यांनी पुर्ण केली. माधवराव पटवर्धन उर्फ कवी माधव ज्युलियन संबोधल्या जाणाच्या मनस्वी व्यक्तिमत्वाचा कलात्मक वेभ भागवत यांनी जखमी पंख’ मध्ये घेतलेला आहे. भागवत यांनी ‘जखमी पंख’ मधुन चरित्रानायकाचे दर्शन घडविताना माधवरावांच्या बालपणापासून मृत्युपर्यंत अनेक घटना प्रभावी निवेदनाव्दारे व संवादाब्दारे शैलीदारपणे दाखविले आहे.
भागवत यांनी इतरही स्वतंत्र कादंबरी लिहिल्या. भागवत यांच्या स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी लेखनात भर घालणारी स्वतंत्र कादंबरी कोकणी समाज जीवनाचा वेगळया अंगाने वेध घेणान्या म्हणून लक्षणीय ठरतात. तु अभुक्त आहेस’, ‘गौरी’, ‘वेलवाडी’, ‘ती कभी कळलीच नाही’, ‘ओथंबलेले आभाळ’ या त्यांच्या स्वतंत्र कादंबऱ्या आहेत. प्रादेशिक व सामाजिक जीवनातील अंतरंगाचा वेध घेणाऱ्या आहेत प्रादेशिक मुल्ये, सामाजिक जीवनाचे अंतरंग, श्रध्दा, लोकमानस अनेक साहित्यिकांनी मराठी कथा, कादंबऱ्यात उभा केलेला आहे. पण बहुतांशी प्रमाणात भोगवाद हाच लेखनाचा विषय झालेला आढळतो मात्र भागवत यांच्या स्वतंत्र कादंबऱ्याच्या ध्येयवादाच्या आशय सुत्राभोवती गुंफलेल्या आहे.भागवत यांच्या स्वतंत्र कादंबऱ्यात पात्राची कर्मवादी, ध्येयवादी, समर्पणवृत्ती वितनाचा मुख्य विषय झालेली आहे.लोकमानसातील अभिरूचीच्या दृष्टीने भागवत यांच्या कादंबऱ्याचे अवलोकन करता भडकपणा, सवंगपणा सीमा ओलांडुन समाज जीवनातील नैतिक सांस्कृतिक भागवत यांच्या सृजनाला लाभलेली आहे. थोडक्यात सनातन अभिरूचीची लोकप्रियता हो विशेष भागवतांच्या कादंबऱ्याना आपोआप चिकटतो.” ( संदर्भ आरती विशेषांक, २००८)
*प्रकाशक : विद्याधर भागवत-*
विद्याधर भागवत यांनी मराठी साहित्यात आपल्या वाड्मयीन निर्मितीने मोलाची भर घातली, त्यांचे वाङ्मयीन कार्य मोलाचे आहे.त्यांनी चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था स्थापन केली.या संस्थेच्या माध्यमातून नवोदित लेखकांनी लिहिलेल्या साहित्याची विविध विषयावरची जवळपास ४५ पुस्तके प्रकाशित करण्यात आली.संस्थेने प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना वेगवेगळया संस्थाकडून पुरस्कारही प्राप्त झाले. ‘आरती’ या वाड्मीयन दर्जा असलेल्या मासिकाचे त्यांनी अनेक वर्ष संपादन केले.आजतागायत हे मासिक २८ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे भागवत यांनी नवोदित लेखकासाठी मार्गदर्शनात्मक कथा,काव्य, कृतिसत्रे,शिबिरआयोजित केली, सहित्य संस्था,प्रकाशक, लेखक आणि वाचक यांच्यात एक सुसंवाद घडावा आणि साहित्यविषयक एक चळवळ पुढे यावी या प्रबळ इच्छेने भागवत आयुष्यभर धडपडत राहिले. त्यांचे बंधू प्रभाकर भागवत यांनी त्यांच्यानंतर आरती मासिक व चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्थेच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले.डॉ. गंगाधर बुवा व भरत गावडे व अन्य पदाधिकारी त्यांचे वाङ्मयीन कार्य पुढे नेत आहे.
++
—आयुष्याच्या अखरेपर्यंत भागवत यांनी साहित्य निर्मिती केली. २००३ साली गुरुपौणिमेच्या दिवशी भागवत यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी उषा भागवत यांनी ‘प्रस्थान -योगी’ या कादंबरीची चौथी आवृत्ती त्यांच्या निधनानंतर प्रकाशित केली.भागवत यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या अस्थी माणगावला डी डी.पॉईटवर निर्मला नदीत विधिपुर्वक सोडण्यात आल्या. त्यांच्या निधनाने मराठी वाचक एका लेखकाला मुकलेला होता.त्यांनी निर्माण केलेली साहित्य निर्मिती वाचकाला त्यांच्या साहित्याची अविटगोडी लावुन गेलेली होती.
या लेखाचा शेवट करताना त्यांच्या एका कवितेकडे लक्ष वेधतो-
‘सारेच प्रश्न माझे बंदिस्त ठेवितो मी’ असे म्हणणारे विद्याधर भागवत म्हटले तर गेले अकाली. ते आपल्या कवेतील आभाळ झाकायला निघून गेले….. ‘अबोली’ नियतकालिकातील याच शीर्षकाच्या कवितेत ते म्हणतात-
रानात आडवाडा चुकवून जातसे मी
गात्रांत पावसाचा मल्हार वेढतो मी
ठेवूनिया सभोती क्षणमुक्तसे उसासे
माझ्या कवेत सारे आभाळ झाकतो मी.
रस्त्यात साथ होती तू झेलल्या दिठीची
ओठात रात होती तू फेकल्या सुरांची
पाठीस बांधुनीया सारा उभा दिगंत
चंद्रास तोलताना तुज पाहतो इथे मी.
माझ्याच ओळखीची कुणि साद घालताहे
मी प्राक्तनास माझ्या सोलून घेत आहे
जाणीव ही अशाने मी भोगता परंतू
सारेच प्रश्न माझे बंदिस्त ठेवितो मी.
————————————-
संदर्भ -१. भरत गावडे यांच्या दै.तरूण मधील लेख भारत २८/९/१९८६
२.आरती विशेषांक २००८
३.रवीद्र भागवत यांच्याशी केलेला संवाद.










