नगर परिषदेची पोलीसांत तक्रार
पाण्याची सुविधा असूनही विंधन विहिरीचा अट्टाहास
राजापूर | प्रतिनिधी:शहरातील रानतळे येथील ऐतिहासिक शिवकालीन तळयाला लागूनच दोनशे मिटर परिक्षेत्राच्या आतमध्ये तेथील मुजावर यांच्याकडून विंधन विहिर खोदकाम करण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. या ठिकाणी पाण्याचा पुरेसा स्त्रोत असताना व या तळयातुन या भागातील नागरीकांना पुरेसा पाणीपुरवठा होत असताना अशा प्रकारे नियमबाहय विंधन विहीर खोदकामाला नगर परिषदेने हरकत घेतली आहे. यामुळे पाण्याचा स्त्रोत कमी होण्याचा धोका निर्माण झाला असून सदरचे काम तात्काळ बंद करावे अशी लेखी तक्रार राजापूर पोलीसांत दिली आहे. तर याबाबत संबधीतांना नोटीसही देण्यात आली आहे. तशी माहिती नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.
शहरातील रानतळे येथे ऐतिहासिक शिवकालीन तलाव आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीला मुबलक पाणी आहे. या विहिरीवरून रानतळे परिसरातील नागरीकांसह साखळकरवाडी व परिसरातील नागरीकांना नगर परिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो. गेले वर्षभरापासून कोटयावधी रूपये खर्चुन या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे.
या भागातील नागरीकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत असताना व या पाण्यावरच साखळकरवाडी भागात पाणीपुरवठा सुरू असताना आता या ठिकाणी तेथील मुजावर यांच्याकडून विंधन विहिर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नियमाप्रमाणे मुळ पाण्याच्या स्त्रोतापासून सुमारे २०० मिटर परिसरात अशा प्रकारे विंधन विहिर खोदणेस मनाई असतानाही अशा प्रकारे विंधन विहिर खोदकाम करून या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्त्रोताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न संबधीतांकडून होत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या प्रकरणी नगर परिषदेच्या वतीने राजापुर पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे. राजापूर नगरपरिषद हद्दीमधील रानतळे परिसरामध्ये सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोताच्या शेजारी श्री. मुजावर यांजकडून बोअरवेलचे काम चालू करणेत आले आहे. शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे स्त्रोतापासून किमान २०० मीटर पर्यंत कोणतीही बोअरवेल खोदता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक हितास बाधा पोहोचू शकते तरी त्या ठिकाणी खोदाइ होणारे बोअरवेलचे काम त्वरीत थांबविणेस विनंती आहे असे पत्र नगर परिषदेने पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
मात्र अशा प्रकारे पाण्याचा स्त्रोत असताना व सुरळीत पाणीपुरवठा होत असताना बोअरवेल पाडण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल आता शहरातील नागरीकांनी उपस्थित केला आहे. तर राजापुरातील या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या परिसरात अशा प्रकारे बोअरवेल खोदून नेमकं काय सिध्द करण्याचा संबधीतांचा प्रयत्न आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र अशा प्रकारे ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या लगत जागेची मालकी सांगून अशा प्रकारे बोअरवेल खोदण्यास आता तीव्र विरोध होत आहे. मात्र या एकूणच प्रकाराकडे राजकिय पुढाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.