संतोष वायंगणकर
कोणतीही व्यक्ती कशासाठी समाजप्रिय होते हे खरंतर ठरवणं तसं अवघडच असतं. सरळ-सरळ तोंडावरच समोर उभं राहून मालवणीतून चार-दोन शिव्या घालून स्वागत करणाऱ्या व्यक्तिंमधला मोकळा ढोकळा असणारा गावरान, रांगडा माणूसही समाजात स्वत:ची एक वेगळी प्रतिमा निर्माण करतो. मालवण तालुक्यातील निरोम गाव. या गावचे अनंत सखाराम राऊत यांच वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
अनंत राऊत यांना आपल्यातून जाऊन चार दिवस झाले. अनंत राऊत निरोम सरपंच, आडवली-मालडी जि.प.सदस्य, निरोम परिसरातील पाच-पंचवीस गावाच्या सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय सहभाग असणारा केंद्रियमंत्री ना. नारायण राणे यांच्यावर व्यक्तिगतरित्या जिवापाड प्रेम करणारा एक रांगडा कार्यकर्ता म्हणूनच अनंत राऊत यांची ओळख होती. अनंत राऊत कुठेही कोणाशीही बोलत असले तरीही त्यांच्या फर्ड्या आवाजातील बोलण्यामुळे त्यांना कोणीही सहज ओळखायचा.
अनंत राऊत राजकारणात सक्रिय असले तरीही त्यांच्यामध्ये एक समाजोपयोगी काम करणारा कार्यकर्ता होता. त्या भागात कोणावरही कोणताही प्रसंग उभा राहिला तरीही अनंत राऊत त्यांच्या पाठीशी उभे असायचे. अनंत राऊत यांची माझी भेट देवगडचे तत्कालिन आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयात झालेली. अनंत राऊत कडवट शिवसैनिक आ.आप्पासाहेब गोगटेंकडेही रस्त्याच्या, पुलाच्या कामासाठी राऊतांचा आग्रह असायचा. कोणतही काम करून घेण्याची अनंत राऊतांची एक खासियत होती. कधीतरी कोणाशीही छान संवाद साधत तर कधीतरी फार वरच्या पट्टीतील बोलण्याने ते आग्रही असायचे. शर्ट-पॅण्ड, कधीतरी सदरा आणि बोलण्यात एक जरब, करडी नजर असं हे बेधडक, बिनधास्त राऊतांचा व्यक्तिमत्व होतं. नियम, कायदे फार न मानणारे पण काम झालं पाहिजे यासाठी आग्रही असणारा कार्यकर्ता होता. जिल्हा परिषद आरोग्य-शिक्षण सभापतीपदही त्यांनी भुषवल होतं. गावच्या देवस्थानचे मानकरी असलेले अनंत राऊतांचे वडील गावपुरूष होते. गावच्या देवस्थानात गावपुरूष ही नामावली अनेक गावातून पहायला मिळते. अनंत राऊतांची अधून-मधून कार्यक्रमातून किंवा त्यांच कणकवलीत येणं झालं तरीही मुद्दाम होऊन प्रहारभवनमध्ये येऊन अर्धातास गप्पा मारूनच अनंत राऊत निघायचे. या अर्ध्यातासात जिल्ह्यातल राजकारण, राणेसाहेब अशा सगळया विषयावर राऊत बोलायचे. राऊतांच बोलतानाच्या दहा-वीस तरी शिव्यांच ते बोलणं खासच असायच. त्या बोलण्यात प्रामाणिकता होती. प्रेम होतं. त्यांच व्यक्त होणं हे रांगडं होतं. त्यात राजकारण, मतलबीपणा असलं काही नसायच .जे बोलायच ते बिनधास्त, बेधडकपणा आणि चेहऱ्याने जरी ते रागिट वाटले तरीही त्यात एक निर्मळ मनाचा माणूस होता. म्हणूनच अनंत राऊतांच्या गावगप्पांमध्ये रमणारा त्यांना मानणारा त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता.
माजी आ. स्व.आप्पासाहेब गोगटेंच्या एका निवडणुकीत कै. नारायण उपरकर उमेदवार होते. यामुळे शिवसैनिक नारायण उपरकर यांना सपोर्ट करीत आहेत. ही बाब तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अनंत राऊत यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं. काहीही झालं तरीही आप्पासाहेब निवडून यायला पाहिजेत. आचरा परिसरातून काही घडता कामा नये असं लक्ष ठेवा. नारायण राणेंचे आदेश शिरसावंध्य मानत अनंत राऊत यांनी लक्ष घातलं आणि आप्पासाहेब गोगटे ९ हजार मतांनी विजयी झाले. गेले काही महिन्यात अनंत राऊतांची भेट नाही. परंतु एक दिलदार, स्पष्टवक्तेपणा, कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!












