कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटका
आंबोली । प्रतिनिधी : आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दूधवडकर यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले. ही घटना आज रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रात घडली. हृदविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
जगदीश दुधवडकर हे गेली पूर्वी सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते. त्यानंतर त्यांना आंबोली येथील पोलीस ठाण्यात जबाबदारी देण्यात आली होती. रविवारी सकाळी ते पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना त्वरीत उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने तत्पुर्वीच त्यांची प्राणजत मालवली.
दुधवडकर यांच्यावर वर्षभरापूर्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. ते नियमित कर्तव्य बजावत असत. शनिवारीही नेहमीप्रमाणे ते ड्युटीसाठी आंबोली येथे गेले होते. मुळचे कर्ली येथील असलेले जगदीश दुधवडकर सध्या सावंतवाडी सालईवाडा येथे राहत असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हेड कॉन्स्टेबल ज्योती दुधवडकर यांचे ते पती होत.












