सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व वैभववाडी तालुका व्यापारी मंडळ यांच्या वतीने करूळ घाटमार्गाची पाहणी
वैभववाडी | प्रतिनिधी : तरळे – कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने करूळ घाट मार्ग वाहतुकीला बंद ठेवण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत करूळ घाटात अत्यंत धिम्या गतीने काम सुरू आहे. अशाच पद्धतीने काम सुरू राहिल्यास वाहतुक सुरूळीत होण्यास दोन वर्ष लागतील. सदर काम युद्धपातळीवर करा. अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई करा. अशी मागणी सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे सदस्य नंदन वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व वैभववाडी तालुका व्यापारी मंडळ यांच्यावतीने करूळ घाट मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी सह. कार्यवाहक राजू जठार, जिल्हा व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी संजय सावंत, वैभववाडी प्रतिनिधी मनोज सावंत, सुरेंद्र नाडकर, नितीन महाडिक, तरळे सरपंच हनुमंत तळेकर, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, लहू पारकर, अंकुश पारकर, बाळा पारकर, संतोष कुडाळकर, बाळू शिरोडकर, रवींद्र पाटील आदी व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी मंडळ पदाधिकारी यांनी करूळ घाट मार्गे प्रवास करत पाहणी केली. ११ किलोमीटर घाट असलेल्या या रस्त्यात केवळ दोन ते तीन ठिकाणी काम चालू असल्याचे त्यांना निदर्शनाला आले. करुळ भट्टीवाडी, दिंडवणे व खडकवाडी नजीकच्या नदीपात्रात दगड माती टाकल्याने पात्र भरून गेले आहे. सदर भराव एप्रिल महिन्यात काढला जाईल, असे उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांनी सांगितले. केवळ संरक्षक भिंती व काही मोर्यांचेच काम झाले आहे. एकूण पाहता फक्त १५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी केवळ ३१ मार्चपर्यंत घाट मार्ग बंद ठेवता येईल असे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता १५ मे पर्यंत कामे पूर्ण होणार नाही. दरम्यान व्यापाऱ्यांनी ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदाराकडे यंत्रसामुग्री नसेल तर काम घेतले कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कधीपर्यंत काम पूर्ण होणार याबाबत लेखी उत्तरे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांनी १५ मे पर्यंत सदर मार्ग वाहतुकीला सुरळीत चालू होईल असे याप्रसंगी सांगितले.












