खेड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले सुमारगड पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित

सुमारगडाच्या जतन व संवर्धन कामासाठी सयुक्तिक प्रयत्न करण्यासाठी शिवभक्तांना आवाहन.
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत किल्ले रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे ऐतिहासिक किल्ले शिवकालीन इतिहासाची साक्ष देत डौलाने उभे आहेत. या तीन किल्ल्यांपैकी सुमारगड हा अतिउंचावर व निसर्गरम्य परिसरात असलेला किल्ला आहे. मात्र गेली कित्येक वर्ष हा किल्ला पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित गेला आहे
सुमारगड हा किल्ला अतिउंचावर असल्याने व जाण्यायेण्यासाठी चांगल्या पायवाटा नसल्याने हा सुंदर किल्ला आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे. परंतु वाडीमालदे गावातील काही निष्ठावंत शिवभक्तांनी काही प्रमाणात सुमारगडाची साफसफाई केली आहे तसेच काही अवघड ठिकाणी स्वखर्चाने लोखंडी शिड्यांची व्यवस्था केल्याने गडप्रेमींचे पाय सुमारगडाकडे वळू लागले आहेत.
         सुमारगड हा विस्ताराने छोटा किल्ला  असला तरी येथे पाहाण्यासारखे बरेच काही आहे. गुहेतील शिवमंदिर, अनेक खांबतळाव,सुतारशाळा , किल्याच्या साईटने डोंगरात कोरलेले तलाव व गुहा हे सुमारगडाचे खास आकर्षण आहे. सुमारगडावर पुर्वी मोठ्याप्रमाणात लोकवस्ती असल्याच्या पाऊलखुणा  पाहाण्यास मिळतात.
       सुमारगड येथे जाण्यासाठी वाडीमालदे, वाडीबेळदार व रसाळगड मार्गे जाता येते. परंतु या तिन्ही वाटा घनदाट जंगलातून जात असून मागील कित्येक वर्षे या शिवकालीन पायवाटांची साफसफाई झाली नसल्याने शिवभक्तांना सुमारगडावर जाण्यासाठी फार अडचणींचा सामना करून जावे लागते.
        सुमारगड चा परीसरात वनविभागाची मालकी आहे त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेऊन सुमारगड कडे जाणाऱ्या शिवकालीन पायवाटांची साफसफाई करून द्यावी. तसेच सुमारगडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई व जतन, संवर्धन पुरातत्त्व विभागाने करावे अशी खेड तालुक्यातील सर्व शिवभक्तांची आग्रहाची मांगणी आहे
       कठीण परिस्थिचा सामना करत वाडीमालदे गावातील शिवभक्तांकडून ऐतिहासिक सुमारगडाचे जतन व संवर्धन करण्याचे सुरू असलेले कार्य महान व कौतुकास्पद असून सर्व निष्ठावंत शिवभक्तांना प्रेरणा देणारे आहे.त्यामुळे या किल्ल्या कडे लक्ष देण्याची मागणी शिवभक्त रामचंद्र बाबू आखाडे यांनी केली आहे