रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै श्री. प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘;फॉऊंडर्स डे’ साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक १२ मार्च २०२४
रोजी फिनोलेक्स ॲकॅडेमी मध्ये ‘फॉऊंडर्स डे’ साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा . श्री. दिनानाथ खोलकर ( चेअर इंडस्ट्री रिलेशन्स, आयईईई पुणे विभाग आणि माजी वरिष्ठ उपाध्यक्ष, टाटा कन्स्लटंसी ) आणि अतिथी म्हणून श्री. संतोष खरे ( सीइओ प्लेटेक इंडिया आणि माजी संचालक कॉग्निझंट टेक्नोलॉजी ) उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला होप फाऊंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा उपस्थित होत्या. फिनोलेक्स अॅकॅडमी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत रत्नागिरी परिसरात अनेक उपक्रम राबवत असते. “फॉऊंडर्स डे” निमित्याने महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रमुख अतिथी मा . श्री. दिनानाथ खोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग
घेतला.
तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी ५, १०, १५, २०, २५ वर्ष अविरत सेवा देणाऱ्या फिनोलेक्स ॲकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना “दीर्घ सेवा पुरस्कार” प्रदान करून गौरवण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा . श्री. दिनानाथ खोलकर यांनी आपल्या भाषणात प्राध्यापकांनी नवीन तंत्रज्ञान आणि नवीन शोधांची माहिती करून घेऊन विद्यार्थ्यांना त्याबद्दल जागरूक केले पाहिजे. प्राध्यापकांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांना नियमितपणे उपस्थित राहण्याचा सल्ला त्यांनी दिला जेणेकरून त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि शोधांची माहिती होईल व संशोधन कार्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या विविध शिक्षणतज्ज्ञांशी देखील ते जोडले जातील. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांमध्ये समाजाला मदत करण्यासाठी आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्यांचे ज्ञान वापरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. उद्योगांमध्ये लागू होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जाणून
घेण्यासाठी प्राध्यापकांनी वारंवार उद्योग भेटी घेतल्या पाहिजेत आणि ते ज्ञान त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मेक इन इंडिया च्या नव्या युगात उत्पादन क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रचंड संधी आहेत आणि या सर्व उपक्रमामध्ये प्राध्यापकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे असा कानमंत्र त्यांनी उपस्थित प्राध्यापकवृदांना दिला. कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्री. संतोष खरे यांनी आपल्या भाषणात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या तांत्रिक कौशल्यांसह विविध व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करून उद्योग व नोकरीसाठी तयार केले पाहिजे. व्यवसायाभिमुख कौशल्यामध्ये तोंडी संवाद, लेखी संवाद, व्यवस्थापन कौशल्ये इत्यादींचा समावेश होतो. सॉफ्ट स्किल्स आमच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा करण्यास आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर स्वतःला सिद्ध करण्यास मदत करतील असे प्रतिपादन केले.
होप फाऊंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या विकासासाठी अविरत दीर्घ सेवा देणाऱ्या प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निखिल कासार व प्रा. स्पृहा आठल्ये यांनी केले. ह्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कॉम्पुटर सायन्स व इंजिनीअरिंग विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. वृषाली निंबाळकर व रजिस्ट्रार श्री. गजानन तारगावकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.











