रत्नागिरी : स्त्रिया पुढच्या पिढीला घडवण्याचे, पर्यायाने देश घडवण्याचे फार मोठे कार्य निरंतर करत आहेत. त्यासाठी प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायला हवा. पण महिला उद्योजकांनी आपला नोकरी-व्यवसाय सांभाळतानाच आपल्या कुटुंबाची पुढची पिढी सक्षम बनवणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजिका, दै. रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ. ऊर्मिला घोसाळकर यांनी केले.
मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येथील विवा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या उद्योगलक्ष्मी पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सौ. विद्या कुलकर्णी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, कौन्सेलर जया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात त्या पुढे म्हणाल्या, उद्योजक म्हणून आपले कर्तव्य महिलांनी जरूर पार पाडावे. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी. पण ती करताना कुटुंबाकडेही दुर्लक्ष करू नये. मुलांचे मित्र बनावे. वॉचमन नव्हे, तर वॉचडॉग बनून त्यांच्याकडे लक्ष द्यावे. मैत्रीच्या, शिक्षकाच्या नात्याने मुलांकडे लक्ष द्यावे. चांगले संस्कार करावेत. त्यांच्या पंखांमध्ये बळ आले की, मुले जे काही चांगले करतील, त्यामुळे मिळणारा कुटुंबाचा आनंद आगळा वेगळा असेल.
इनुजा शेख यांनी कौशल्यविकास विभागाविषयीची थोडक्यात माहिती दिली. त्या म्हणाल्या की, कौशल्य विकास आणि रोजगार विभागातर्फे अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. शासनाच्या महास्वयम पोर्टलव सर्व योजनांची माहिती आहे. प्रत्येक क्षेत्रातील रोजगारांबाबत अकुशल व्यक्तींना कुशल होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही उद्योजकालाही शासनाच्या अनुदानासह असे ट्रेनिंग सेंटर उभारता येऊ शकते. त्याचा फायदा घ्यावा. कोणताही व्यवसाय करणारी, नोकरदार किंवा गृहिणी असली, तरी प्रत्येक महिला पूर्णवेळ कामातच असते. ती स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध असते. तिला सन्मान मिळायला हवा. सॅटर्डे क्लबच्या प्रतिज्ञेचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, या प्रतिज्ञेतून चांगला संदेश मिळतो. त्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रीयांनी एकत्र यावे, उद्योग-व्यवसाय करावा. एकमेकंना सहकार्य करावे.
विद्या कुलकर्णी यांनी महिलांसाठी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, महिलांना उद्योगासाठी ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्यांना तर १०० टक्क्यांपर्यंतही अनुदान मिळते. महिला उद्योग धोरणातही अनेक योजना आहेत. महिलांना जागेच्या खरेदीपासून उत्पादनाच्या विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अनुदान आणि मदत मिळते. मैत्री पोर्टल तसेच वेबसाइटवरून महिलांनी शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी. महिला सक्षम आहेत. त्या आर्थिक निर्णय घेऊ शकतात. स्वतंत्र आहेत. त्यांनी तसाच विचार करावा. इक्विटी आणि इक्वॅलिटीमधील फरक सांगून त्या म्हणाल्या की, केवळ समानता असून चालणार नाही, तर त्यांना बरोबरीची वागणूकही समाजाने दिली पाहिजे.
सौ. जया सामंत यांनी सांगितले की, प्रत्येक स्त्रीमध्ये उद्योजिका लपलेली असते. त्यामुळे उद्योजक म्हणून यशस्वी होईलच. पण महिलांनी शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनले पाहिजे. आरोग्यसंपन्नतेचे धडे पुढच्या पिढीला त्यांनी दिले पाहिजेत. सध्याच्या धावपळीच्या युगात महिला सहज स्वतःकडे दुर्लक्ष करतात. तसे करू नये. याचबरोबर सर्वांना आपल्याबरोबर घेऊन जावे. भाजीवाली, कामावाली अशा बायकांना समस्या भेडसावत असतात. त्यांनासुद्धा मदतीचा हात दिला, समाजसेवेचा खारीचा वाटा घेता येईल का, हेही महिलांनी पाहावे.
अग्रणी बँक बँक ऑफ इंडियाचे एमएसएमई विभागाचे प्रमुख कुमार प्रमोद सिंग यांनी बँकेच्या विविध कर्ज आणि ठेव योजनांची माहिती दिली.
.
यावर्षीचा पहिला उद्योगलक्ष्मी पुरस्कार सौ. पारिजात कांबळे (गुहागर) यांना ऊर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते यांना देण्यात आला. सौ. कांबळे गुहागरमध्ये महिला बचत गटांना बरोबर घेऊन तळागाळातील महिलांना रोजगार देताना तीन हॉटेल्स चालवितात. दुसरा पुरस्कार सौ. मृणाली साळवी यांना ॲड सौ. जया सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ. साळवी यांनी मृणाल फॅशन वर्ल्ड अँड ब्यूटी स्किल्सच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार मिळवून दिला असून ३५० पेक्षा अधिक जणींना प्रशिक्षण दिले आहे. सौ. श्रद्धा कळंबटे यांचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, तर सौ. माधुरी कळंबटे यांचा महाराष्ट्र शासनाच्या स्टार्टअप स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित प्रत्येक उद्योजिकेला व्यवसायाची वाट निवडल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन विवेक तांबे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सॅटर्डे क्लबसोबत ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट, श्री स्वामी समर्थ टायर्स, वायंगणकर हॉटेल्स, त्याचबरोबर माऊली डेव्हलपर्स आणि श्री गणेश ऑटो यांनी विशेष साह्य केले.
सॅटर्डे क्लबविषयीची माहिती रत्नागिरी चॅप्टरचे चेअरपर्सन तुषार आग्रे, सेक्रेटरी प्रतीक कळंबटे, तर महिला विभागाची माहिती. मानसी महागावकर यांनी दिली. अधिकाधिक महिलांनी सॅटर्डे क्लबशी जोडले जावे, असे आवाहन सॅटर्डे क्लबचे कोकण रिजनचे हेड राम कोळवणकर यांनी केले.