खेड न्यायालयातर्फे हुंडा बंदी कायदा व कामाच्या ठिकाणी स्त्रीचा लैंगिक छळ करणे या दोन विषयांवर माहिती शिबीरे

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१ डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार पंचायत समिती खेड सभागृहामध्ये “हुंडा बंदी कायदा व कामाच्या ठिकाणी स्त्रीचा लैंगिक छळ करणे” या दोन विषयांवर मार्गदर्शन शिबीरे घेण्यात आली.

या वेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश खेड श्री.पी.एस. चांदगुडे यांनी समाजामध्ये हुंडा दिला जातो व घेतला जातो यामुळेच हुंडा बंदी’ हा कायदा करण्यात आला असून या कायदयान्वये कमीत कमी ५ वर्ष कारावासाची व १५ हजार दंड अशी शिक्षेची तरतूद केलेली आहे. तसेच हुंडा या संकल्पनेत मागणी न करता दिलेल्या भेटवस्तूंना वगळण्यात आलेले आहे असेही त्यांनी सांगितले. या कायदयामध्ये आरोपी निर्दोष आहे हे आरोपीलाच सिध्द करावे लागते असे सांगून हुंडा घेणारा जेवढा दोषी आहे तसा हुंडा देणारा पण दोषी असतो असे सांगून स्त्रीविषयक अधिकारांची समाजामध्ये जागृती होणे फार गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सह दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड श्री. एम. व्ही. तोकले यांनी महिलांना कुठल्याही कार्यालयामध्ये सहजतेने काम करणे सोपे राहिलेले नसून काही कार्यालयामध्ये म्हणजेच पोलीस ठाणे, हॉस्पीटल येथे महिलांना नाईट डयुटी करावी लागते तिथे काम करताना अशाप्रकारचे गुन्हे घडू शकतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हा कायदा स्पेशल कायदा नसला तरी अन्य वेगवेगळ्या कायदयात त्याची तरतुद करण्यात आलेली असून यासंदर्भात त्यांनी विशाखा विरुध्द स्टेट ऑफ राजस्थान” या केसमधून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स बाबत मार्गदर्शन केले. तसेच ‘निर्भया’ या गैंगरेप नंतर भारतीय दंड संहिता मध्ये बदल करण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास तदर्थ जिल्हा न्यायाधीश खेड श्री.पी.एस. चांदगुडे, सह दिवाणी न्यायाधीश व स्तर खेड श्री. एम. व्ही. तोकले तसेच पंचायत समिती कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खेड पंचायत समितीचे बिडीओ श्री. वाय. एस. भांड, श्री.एस. के. धनवटे, अधीक्षक श्री. एस. एल. लोंढे, तसेच तालुका विधी सेवा समिती खेडचे कर्मचारी श्रीमती कांचन साळवी, श्री संदिप जोशी यांनी परिश्रम घेतले.