बुद्धिस्ट वकील संघटनेच्या वतीने चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिनी महामानवाला अभिवादन

 

रत्नागिरी l प्रतिनिधी :२० मार्च ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह क्रांती दिनानिमित्त रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बुध्दिस्ट वकील संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला होता. यामुळेच २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.

 

ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन गेल्या अनेक वर्षांपासून २० मार्च रोजी साजरा करण्यात येतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी महाड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. या दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा शासकिय रूग्णालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला बुद्धिस्ट वकील संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सहायक सरकारी वकील व नोटरी ॲड . प्रफुल्ल साळवी, ॲड. शिवराज जाधव, नोटरी ॲड. राहुल कदम, ॲड. मिलिंद जाधव सोबत रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.