सुसेरीत आंब्याच्या झाडांना आग

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील सुसेरी नं. २ येथे मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास श्री खेमनाथ मंदिराजवळील आंब्याच्या झाडांना आग लागली. आगीबाबत नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवण्यात आल्यानंतर कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.
येथील आंब्याच्या झाडांना आग लागल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. आंब्याच्या सुक्या झाडांना आग लागल्याने आग भडकत गेली. नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय घाग, वाहनचालक विद्याधन पवार आदी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. जळालेले मोठे सुके झाड, मंदीराच्या दिशेने पडण्यापासून रोखण्यात आल्याने मंदिराची हानी रोखण्यास अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.