ज्ञानदीप कॉलेजला ‘नॅक’चे बी ++ मानांकन

खेड (प्रतिनिधी)ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेची ‘बी+ +’ हे मानाचे मानांकन प्राप्त झाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थी हित जपत त्यांना सर्वतोपरी चांगले व गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्ञानदीप संस्थेकडून नेहमीच होत आहे. दि. १६ व १७ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (नॅक) घेण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीच्या मूल्यांकन परीक्षणामध्ये २.८८ सीजीपीए गुणांसह बी ++ श्रेणी प्राप्त झाली. महाविद्यालयाच्या या यशामुळे ज्ञानदीप परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

अध्यक्ष डॉ. गोपाल चंद्र हजारिका (संचालक, गणित विभाग, दिब्रुगढ विद्यापीठ, आसाम) तसेच सदस्य डॉ. मुनेश चंद्र अधिकारी (डीन, फकीर मोहन विद्यापीठ, ओरिसा) व डॉ. चंद्रदत्त सुंठा ( संचालक, उच्च शिक्षण विभाग, उत्तराखंड) यांच्या समितीने या मूल्यांकनाचे काम पाहिले.

संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्याकडून महाविद्यालयाच्या या यशाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.