माजी विद्यार्थी असोसिएशन चे कार्य कौतुकास्पद- लांजा तहसीलदार प्रमोद कदम

लांजा महाविद्यालयात पार पडला कृतज्ञता सन्मान सोहळा

लांजा | प्रतिनिधी  : माजी विद्यार्थी असोसिएशन,लांजा चे काम कौतुकास्पद असून असोसिएशनने सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला कृतज्ञता सोहळा हा कृतार्थतेचा सोहळा असल्याचे प्रतिपादन लांजाचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी केले.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांज्याचा स्थापना दिवस व संस्थेचे सी.ई.ओ.भाऊ वंजारे यांच्या वाढदिवसाचे अौचित्य साधत माजी विद्यार्थी असोसिएशनने संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व वरिष्ठ महाविद्यालय या दोन्ही शैक्षणिक संकुलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या गत ७५ वर्षातील शिक्षक ,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.याप्रसंगी तहसीलदार प्रमोद कदम बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मनोहर बाईत,संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये,सी.ई.ओ.भाऊ वंजारे,उपाध्यक्ष सुनिल उर्फ राजु कुरूप,सचिव विजय खवळे , संचालक महंमद रखांगी,पुरूषोत्तम साळवी, प्रसन्ना शेट्ये,प्राचार्य डाॅ.अरविंद कुलकर्णी, लांजा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या आठवले आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ३२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कृतज्ञता सन्मानाने सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या शिक्षक पालक संघाने हायस्कूलमध्ये मुलींच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहासाठी माजी विद्यार्थी असोसिएशन निधी देऊन सहकार्य करावे अशा केलेल्या सूचनेप्रमाणे माजी विद्यार्थी असोसिएशनने नुकत्याच यशस्वी केलेल्या सेलिब्रिटी नाईट कार्यक्रमातुन जमा केलेल्या शैक्षणिक निधीतून चार लाख रुपयाचा धनादेश न्यू एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द केला.तर शिक्षक पालक संघाने तीन लाखाचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.यावेळी मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुलींचे आधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात येईल याची ग्वाही संस्थेने दिली.

कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक महंमद रखांगी यांनी माजी विद्यार्थी असोसिएशनच्या दमदार वाटचालीचे कौतुक केले. प्रास्ताविक प्राध्यापक डाॅ.के.आर.चव्हाण यांनी, निवेदन प्राध्यापक डाॅ.राहूल मराठे यांनी तर आभार विजय हटकर यांनी मानले.