हर्चे येथील टिपरी खेळे या पारंपारिक खेळाने शिंगोसाला सुरुवात  

कमरेला पेरणे (१० वारी साडी) बांधून टिपरी खेळे केले जातात सादर

 टिपरी खेळ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे तीन वाजता होते समाप्ती

 संतोष कोत्रे l  लांजा – लांजा तालुक्यातील हर्चे गावातील टिपरी खेळे या पारंपारिक खेळ्यांना सुरुवात झाली आहे. आज दोन मार्च रोजी हे टिपरी खेळे सादर करण्यासाठी गावातील ३० ते ४० व्यक्ती गावाबाहेर पडले असून पुढील तीन ते चार दिवस हे सर्व व्यक्ती टिपरी खेळाच्या माध्यमातून शिवार आंबेरे ,पूर्णगड भडे आदी गावात गाव फिरुन त्यानंतर पुन्हा हर्चे गावात परततील आणि या टिपरी खेळ्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सांगता होईल.

संपूर्ण कोकणात शिमगोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो .हा उत्सव साजरा करत असताना त्या त्या गावच्या प्रथा, परंपरा या वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी देवाची पालखी घरोघरी फिरते तर काही गावांमध्ये केवळ देवाची निशाणे घरोघरी जातात. अशाच प्रकारे हर्चे गावची गेल्या शेकडो वर्षांची एक वेगळी प्रथा परंपरा या ठिकाणी पहावयास मिळते. शिमगोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर येथील ग्रामदैवत सत्येश्वराचे मांडेश्वराचे खेळे हे टिपरी खेळे संपूर्ण गावात प्रसिद्ध आहेत. टिपरी खेळे म्हणजे ग्रामदैवताचे पेरणे हे कमरेला बांधले जाते. पेरणे म्हणजे नवी कोरी १० वारी साडी ही कमरेला बांधली जाते. सुमारे ३० ते ४० हर्चे गावातील लोक या टिपरी खेळ्यात सहभागी होतात. त्यानंतर टिपरी खेळे सादर करण्यासाठी हे सर्वजण अनवाणीच गावाबाहेर पडतात.

अशाप्रकारे हर्चे गावातील गावकरी हे टिपरी खेळ्यांच्या माध्यमातून गावाबाहेर पडले आहेत .त्यानंतर पुढील तीन/ चार दिवस शिवार आंबेरे , पूर्णगड, भडे या गावातील प्रत्येक घरी खेळे सादर करतील. दिवसा खेळे व रात्री मुक्काम याप्रमाणे या टिपरी खेळ्यांचा कार्यक्रम चालणार आहे. ज्याप्रमाणे ग्रामदेवतेची पालखी घरोघरी फिरते त्याचप्रमाणे हे टिपरी खेळे गावाच्या प्रत्येक घरोघरी जाऊन खेळे सादर करतात. सायंकाळी उशीर झाला त्या ठिकाणी मुक्काम केले जातो. अशा प्रकारे शिवार आंबेरे, पूर्णगड, भडे अशा प्रकारे करून चौथ्या दिवशी हे टिपरी खेळे पुन्हा आपल्या गावात म्हणजेच हर्चे गावात येतात. हर्चे गावात हे टिपरी खेळे आल्यानंतर पुन्हा संपूर्ण गावातील वाड्यांमधील प्रत्येक घरी हे खेळे जातात आणि आपले टिपरी खेळे सादर करतात

गेल्या शेकडो वर्षांची या टिपरी खेळ्यांची प्रथा परंपरा आहे .अनेक वर्षे पारंपारिक पद्धतीने हे टिपरी खेळे सादर केले जातात . टिपरी खेळे गावकर गावचे श्री. झिळू निवळकर आणि यशवंत कुसुम व प्रभाकर वाडेकर, लकू वाडेकर, बबन निवळकर , सहदेव तरळ, यांच्या मार्गदर्शनाखाली हे टिपरी खेळे सादर केले जातात.

संपूर्ण हर्चे गावातील घरोघरी हे टिपरी खेळे सादर केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे तीन वाजता या टिपरी खेळाची समाप्ती होते .अशा या टिपरी खेळ्यांना मार्चपासून सुरुवात झाली आहे.