शीळ येथे मंगळवारी ब्राम्हणदेवाची पालखी ‘खुणा’ शोधणार

 

राजापूर (प्रतिनिधी): शहरानजीकच्या शीळ येथील श्री ब्राम्हणदेव-पावणादेवी पालखीचा मंगळवार 2 एप्रिल खुणा शोधण्याचा कार्यक्रम होणार आहे. सतीचा मळा येथे सकाळी 8 वा. होणाऱ्या या खुणा शोधण्याच्या अनोख्या प्रथेचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

कोकणातील शिमगोत्सवामध्ये उत्सवानंतर खूणा घालण्याची प्रथा रूढ आहे. विशिष्ट ठिकाणी लपविण्यात आलेली खुणा’ ग्रामदेवतेची पालखी शोधुन काढते. शिमगोत्सवात देवाचे कार्य कोणतीही चूक न होता निर्विघ्नपणे पार पडले की नाही याची खुद्द ग्रामदेवतेकडूनच खातरजमा करून घेण्यासाठी खूणा घालण्याची प्रथा आहे. खुणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्या ठिकाणी खड्डा खोदुन त्यात नारळ आणि फुलं लपवितात आणि दुसर्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्या ठिकाणी आणून ढोलताशाच्या गजरात नाचविली जाते. यावेळी खूणा ठेवणारे मानकरी खूणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवितात त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खूणा बिनचूक शोधुन काढते. ग्रामदेवतेप्रती श्रध्दा दृढ करणारी ही प्रथा अनेक गावांत सुरू आहे. खूणेच्या या परंपरेविषयी काही रंजक कथाही ग्रामीण भागात सांगितल्या जातात. त्यामुळे खूणेविषयी सर्वानाच कुतुहल आणि उत्सुकता असते. ही खूणेची प्रथा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

शीळ येथे श्री ब्राम्हणदेवाच्या शिमगोत्सवानंतर खूणा घालण्याची प्रथा आहे. हा खुणा शोधण्याचा कार्यक्रम येत्या मंगळवारी (ता.2) होणार आहे. यावेळी भाविकांनी खुणा शोधण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ, नागरेकरवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.