पर्यावरणस्नेही उत्पादन
रत्नागिरी : मानवी जीवनात वाढलेला रसायनांचा वापर आणि पर्यावरण संतुलन हा मुद्दा अलिकडे अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णपणे हर्बल द्रव्ये वापरून तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन केंद्र तालुक्यातील हरचिरी येथे सुरू झाले. विशेष बाब म्हणजे ही पॅड्स विघटनाद्वारे पर्यावरणात मिसळून जाणारी आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या चांदेराई शाखेच्या व्यवस्थापक प्रतिमा जाधव यांच्याहस्ते या उपकमाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम हरचिरी गावच्या रहिवासी रश्मी प्रभुदेसाई यांनी सुरू केला आहे. उद्घाटन कार्यकमाला डॉ. श्रृती ठाकूर, डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. अकल्पिता चक्रदेव, रोहित भुरवणे, उद्योजिका जान्हवी भुरवणे, नर्सरी उद्योजक विनोद प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योजिका रश्मी प्रभुदेसाई यांनी सांगितले की, विविध रसायनांच्या वापरामुळे अनेक महिलांवर पॅड्सच्या वापराचे दुष्परिणाम दिसून येतात. यासाठी हर्बल द्रव्य वापरून सॅनिटरी पॅडस् तयार करण्याचा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर अनेक वर्ष होता. आता तो साकारत आहे. हे पॅडस् विघटनशील असून पर्यावरणात ते सहजपणे सामावले जाऊ शकतात. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा रितीने पॅड्सची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांना त्याचा लाभ नक्की होईल. रत्नागिरी जिल्ह्यात अशा स्वरूपाचा हा पहिलाच उद्योग असावा, असेही त्यांनी नमूद केले.