
लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वनगुळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वनगुळे नंबर १ च्या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
वनगुळे शाळेच्या शैक्षणिक यशाचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. यापूर्वीही शाळेने विविध परिक्षेत घवघवीतपणे यश संपादन केलेले आहे. शाळेच्या कु. हर्षवर्धन भिमराव गंगणे आणि कु.वैष्णवी संतोष शिंदे या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र निवळे, शिक्षक विलास गोरे, बाळू नागरगोजे यांचे मार्गदर्शन लाभले.ही निवड झाल्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. निवळे, श्री गोरे, श्री. नागरगोजे ,श्रीम. ठाकूर देसाई , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गणपत गुरव आदी उपस्थित होते वाकेड सरपंच प्रभाकर गुरव, श्री. चव्हाण यांनी देखिल अभिनंदन केले.












