राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीच्या प्रगतीची यशस्वी घौडदौड कायम

 

सन २०२३-२४ आर्थिक वर्षात २ कोटी १३ लाखाचा ढोबळ नफा

चालू आर्थिक वर्षा दिड कोटीच्या एकत्रित व्यवस्याचा संकल्प  

राजापूर (वार्ताहर): सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरीब जनतेची पतपेढी अशी ओळख असलेल्या येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने आपल्या प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला आहे. पतसंस्थेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी बजावताना संस्थेने २ कोटी १३ लाख इतका ढोबळ नफा मिळवताना १ कोटी २६ लाख इतका निव्वळ नफा प्राप्त केला आहे. तर शंभर कोटींच्या एकत्रिक व्यवसायाकडे वाटचाल करताना पतसंस्थेने या आर्थिक वर्षात ११६ कोटी ४४ लाखाचा एकत्रिक व्यवसाय केला असून मागील वर्षाअखेरील एकत्रीत व्यवसायात १७ टक्के इतकी वाढ करत पतसंस्थेने आपल्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवली असल्याची माहिती पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी दिली आहे.

राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात केलेल्या एकूणच प्रगतीची माहिती देण्यासाठी बुधवारी पतसंस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष मांडवकर यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. पतसंस्थेने सुयोग्य असे नियोजन करून यावर्षीही कर्ज वितरण, कर्जवसुली, ठेवी अशा सर्वच स्तरावर प्रगती साधल्याची माहिती श्री. मांडवकर यांनी दिली.

संस्थेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ९६७ ने सभासद वाढ होऊन एकूण सभासद संख्या १३ हजार ५७२ इतकी झाली. सदरची सभासद वाढ ८ टक्के इतकी आहे. वसूल भागभांडवलामध्ये रक्कम रु.६१ लाखाने वाढ होऊन एकूण वसूल भागभांडवल ३ कोटी ६१ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ २० टक्के इतकी आहे. निधी मध्ये रक्कम रु. १ कोटी २९ लाखाने वाढ होऊन एकूण निधी रु. ५ कोटी ४१ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ हि ३१ टक्के इतकी आहे. गुंतवणूका मध्ये यावर्षात घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये ५ कोटी १५ लाख ने वाढ होवून एकूण गुंतवणुका रु. २६ कोटी १८ लाख इतक्या झाल्या आहेत. सदरची वाढ ही २५ टक्के इतकी आहे. ठेवी मध्ये रक्कम रु. १० कोटी ९ लाखाने वाढ होऊन मार्च २४ अखेर एकूण ठेवी रक्कम रु. ६७ कोटी ११ लाख इतक्या झाल्या आहेत. सदरची वाढ हि १८ टक्के इतकी आहे. कर्जा मध्ये रक्कम रु. ७ कोटी २५ लाखाने वाढ होऊन एकूण कर्ज हि रु. ४९ कोटी ३३ लाख इतकी आहेत. सदरची वाढ हि १७ टक्के इतकी आहे.

मार्च २४ अखेर खेळत्या भागभांडवलात रक्कम रु. १२ कोटी ८० लाखाने वाढ होऊन एकूण खेळते भागभांडवल रु. ७९ कोटी २९ लाख इतके झाले आहे. सदरची वाढ हि २० टक्के इतकी आहे. एकत्रित व्यवसाय या आर्थिक वर्षात १०० कोटींवर नेण्याचा संकल्प पुर्ण करताना एकत्रित व्यवसाय रक्कम रु. १७ कोटी ३४ लाखाने वाढून मार्च २४ अखेर एकूण एकत्रित व्यवसाय ११६ कोटी ४४ लाख इतका झाला आहे. सदरची वाढ हि १७ टक्के इतकी आहे.

पतसंस्थेला यावर्षी ढोबळ नफा २ कोटी १३ लाख इतका झाला आहे. त्यामधुन आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी २६ लाख इतका झाला आहे. यावर्षीही वसुलीचे प्रमाण ९९ टक्के इतके राखत सीडी रेशो ६६ टक्के, ढोबळ एनपीए १.३३ टक्के तर एनपीए शुन्य टक्केची ची परंपरा कायम राखली असल्याचे मांडवकर यांनी नमुद केले.

तर गतवर्षी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पाली, सापुचेतळे, भांबेड व साखरपा या चारही शाखा नफ्यात असून कर्ज वसुलीचे प्रमाणे त्यांनी १०० टक्के राखले आहे. तर अन्य शाखांनी ९९ टक्के इतके कर्जवसुलीचे प्रमाण राखले आहे. संस्थेने सभासद हिताला प्राधान्य देताना आरटीजीएस, एनईएफटी, एमएमएस अलर्ट, मिनी एटिएम, कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कामकाजाची दखल घेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बँको तसेच सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तयरीय प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार पतसंस्थेला प्राप्त झाल्याची माहिती श्री. मांडवकर यांनी दिली.

संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, स्थानिक कमिटी, व्हा. चेअरमन प्रकाश लोळगे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर, कर्ज वसुली अधिकारी श्रीकांत राघव, माजी संचालक, सीए निलेश पाटणकर, अ‍ॅड. एस. एम. देसाई, शाखाधिकारी, कर्मचारी, पिग्मी व आरडी एजंट या सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचे मांडवकर यांनी नमुद केले. बँकेच्या प्रगतीचे हे यश सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी नमुद केले. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी प्रास्ताविक केले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, संचालक रमेश सुद, सोनू तिर्लोटकर, सौ. मानसी दिवटे, अनंत मोरवसकर आदी उपस्थित होते.