हुंबरवणे ग्राम विकास मंडळ चिंचूर्टी व ग्रामस्थ करणार उपोषण

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजतागायत वाडीकडे जाण्यासाठी रस्ता नाही

येथील वृद्ध, महिला, अपंग, शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय चार किमी ची पायपीट

वाडीकडे जाणारा रस्ता आणि पूल दुरुस्तीसाठी 25 लाख रुपये मंजूर होऊनही कामाला सुरुवात नाही

आणि याच्या निषेधार्थ ग्रामस्थ करणार २८ मार्चपासून उपोषण

लांजा | प्रतिनिधी : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटली तरी अद्यापही रस्ता नसल्याने तालुक्यातील चिंचुर्टी येथील ग्रामस्थांना चार किमी ची पायपीट करावी लागत आहे .मात्र याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर हुंबरवणे ग्राम विकास मंडळ चिंचुर्टी आणि ग्रामस्थ हे दिनांक २८ मार्चपासून उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे ते
लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ मांडवकर यांनी म्हटले आहे की, तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या हुंबरवणेवाडी ही पालू ग्रामपंचायत पासून चार किमी अंतरावर, उंच डोंगरावर बसलेली वाडी आहे. आमच्या वाडीची लोकसंख्या ३५० इतकी आहे .आज देशाचा 75 वा आजारी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आमची वाडी मात्र अद्यापही रस्त्यापासून वंचित आहे .परिणामी आमच्या वाडीतील वृद्ध, अपंग, महिला ,शालेय विद्यार्थी यांना दररोज चार किमी ची पायपीट करावी लागत आहे. आरोग्य, रेशन आणि शिक्षणाकरिता येथील विद्यार्थी, ग्रामस्थांची अवघड डोंगरावरच्या पायवाटेने पायपीट सुरू आहे.
सन २०२०-२१ मध्ये रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रमांतर्गत पालू चिंचुर्टी हुंबरवणेवाडी रस्त्यासह मोर्या व संरक्षण भिंत या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामाची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आज तीन वर्षे उलटून गेली तरी देखील अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.त्यामुळे आम्हा ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.
या रस्त्याकरता अनेकदा पाठपुरावा करून देखील आमची कोणीच दखल घेतली नाही. आणि म्हणूनच नाईलाजाने आम्ही सर्व वाडीतील ग्रामस्थ २८ मार्चपासून उपोषणास बसत आहोत याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे .याबाबतचे निवेदन लांजा पोलीस ठाणे ,लांजा तहसीलदार ,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.