भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटया खोल विहीरीत पडून मृत्युमुखी

 

राजापूर तालुक्यातील नेरके येथील घटना

राजापूर (वार्ताहर): भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटया खोल विहीरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना तालुक्यातील नेरकेवाडी येथे घडली आहे. बुधवार रात्रौ ९ वाजण्याची दरम्यान ही घटना घटल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेरकेवाडी येथील श्रीमती वनिता तानाज मांडवकर यांच्या राहते घराच्या परिसरातील असलेल्या विहिरीमध्ये वन्य प्राणी खवल्या मांजर पडून मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती श्रीमती वनिता मांडवकर यांनी वनपाल राजापूर यांना फोन वरून दिली. त्यानी सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवले. सदरच्या विहरीची खोली 60 ते 70 फूट व रात्रीचा अंधार असल्यामुळे विहिरीत काही दिसत नसल्याने तसेच आवाज व कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून आली नाही त्यामुळे गुरूवार १० एप्रिल रोजी सकाळी ८ वा. वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी विहीर सुमारे ६० ते ७० फुट खोल व १० फुट रुंद असून विहिरीवर ३ फुटाचा चौकोनी कठडा आहे कटड्यावर शेडनेट झाकलेले असून ते मध्यभागी फाटलेले आहे सदरची विहीर पूर्णपणे कातळ भाग असलेल्या ठिकाणी खोदलेली असुन विहीरी मध्ये सहा ते सात फुट पाणी असून त्यावर बिबट्या मृत अवस्थेत तरंगताना दिसला. त्यांनतर रेस्क्यू टीम च्या मदतीने विहिरी मध्ये प्लास्टिक ची टोपली सोडून त्यांचा सहाय्याने बिबट्याला विहिरी बाहेर काढण्यात आले.

त्यानंतर मा. पशुवैद्यकीय अधिकारी, राजापूर यांचे मार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदरचा बिबट्या अंदाचे १ वर्षाचा असुन तो मादी जातीचा आहे. सदरचा बिबट्या हा एक दिवसापूर्वी विहिरी मध्ये पडला असुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे अहवाल पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांनी दिला आहे.

वनपाल सदानंद घाटगे यांनी सदर बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असल्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्या नंतर मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री.वैभव बोराटे ,वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले. सदर कामगिरी साठी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार वनपाल सदानंद घाटगे ,वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी श्री. प्रभू साबणे, वनरक्षक कांदळवन श्री किरण पाचारणे व रेस्क्यू टीमचे श्री दीपक चव्हाण, श्री विजय म्हादये,श्री गणेश गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्री प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केली आहे.