राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील कुंभवडे गावचे माजी सरपंच व प्रसिध्द आंबा बागायतदार दिलीप सदानंद प्रभुदेसाई (७६) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.
कुंभवडे मधलीवाडी येथील रहिवासी असलेले दिलीप प्रभुदेसाई यांनी कुंभवडे गावचे सरपंचपद भुषविले होते. या काळात त्यांनी विविध विकास कामांना न्याय दिला होता. तर गेली अनेक वर्षे कुंभवडे गावचे शासमान्य रास्त धान्य दराचे दुकानही चालविले होते. या परिसरातील एक परोपकारी व दानशूर व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.
कुंभवडे गावातील जुने आंबा बागायतदार अशी ओळख असलेल्या दिलीप देसाई यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक गावपातळीवर अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला होता. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती.त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रसाद, सुन, दोन विवाहीत मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.












