भारताला महासत्तेकडे नेत असलेल्या पंतप्रधान मोदींना पुन्हा संधी देणे आपले कर्तव्य : नारायण राणे 

 

कोकणातील एकाही घरात गरिबी राहू नये यासाठी मी प्रयत्नशील 

कोकणचा संपूर्ण कायापालट हेच पुढील लक्ष 

नारायण राणेंवर टीका हाच विरोधकांचा अजेंडा 

माजगाव जिल्हा परिषद विभागीय पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज आपला भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एक कर्तुत्ववान पंतप्रधान असा त्यांचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. आपला देश आत्मनिर्भर बनावा,स्वाभिमानी व आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रगतीकडे जाणाऱ्या या देशाची ही वाटचाल अशीच अखंडित राखण्यासाठी पंतप्रधान मोदींना पुन्हा संधी देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजगाव जिल्हा परिषद विभागीय महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, संदीप कुडतरकर, शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, पंचायत समिती माजी सभापती गौरी पावसकर, माजी पं.सं. सदस्य बाबू सावंत, शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, महेश धुरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याच काम केलं. गरीब, महिला, विद्यार्थी, कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी देशातील ८० कोटी लोकांना मोदींनी मोफत अन्नधान्य सुरू केले आजही ती योजना सुरू आहे. ४ कोटी गरिबांना पक्की घरे देण्यात आली. ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधली. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरातील महिलांना धुरमुक्त केले.

देशाच्या समृद्धीसाठी त्यांनी विविध ५४ योजना राबविल्या. विविध उद्योगधंद्यांच्या माध्यमातून सर्व स्तरातील युवक आत्मनिर्भर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी आदिवासी मागासवर्गीयांना ९० सबसिडी दिली जाते. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

मी गेली ३४ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे‌. ९० सालात कणकवली मालवणमधून आमदार झालो. तेव्हा येथील परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असा निर्धार केला. रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्न सोडविले. मी मुंबईतून जिल्ह्यात आलो तेव्हा इथलं दरडोई उत्पन्न ३५ हजार होत. आज २ लाख ४० हजार दरडोई उत्पन्न जिल्ह्याच आहे‌‌. ही आर्थिक प्रगती झाली.

पुढे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेता ते केंद्रीय मंत्री अशी पद मला प्राप्त झाली. या पदांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट कसा होईल याकडे कायम लक्ष दिलं.

आजही आरोग्य, उद्योग, शैक्षणिकदृष्ट्या आपण प्रगती करत आहोत. रोजगारासाठी अनेक कारखाने इथे येणार आहेत. इथल्या युवक युवतींनी टेक्नीकल शिक्षण घ्यावं, ओरोस येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घ्याव. हे शिक्षण तुम्हाला नोकरीसह उद्योजक बनण्यासाठी उपयोगी ठरेल. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, आयपीएस अधिकारी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.

मनीऑर्डरवर जगणाऱ्या या जिल्ह्याची पूर्ण परिस्थिती बदलायची आहे. दोडामार्गला ५०० कारखाने आणायचा माझा प्रयत्न आहे. मेडिकल इक्विपमेंट व फुड प्रोसेसिंगबाबतचे उद्योग तिथे येणार आहेत. विमान, रेल्वेसह वाहतूक व्यवस्था जवळ आहे. त्यामुळे अनेक उद्योग येथे येण्यासाठी इच्छुक आहेत. पर्यटनाच्या माध्यमातूनही अनेक फाइव स्टार हॉटेल या भागात होणार आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे येणारा काळ बदलणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझ्या जिल्ह्यातील तरूण- तरूणी मोठे अधिकारी बनत आहे. मुंबई, पुण्यात मोठ्या कंपन्यांत चांगल्या पदावर आहेत हे बघताना व ऐकताना होणारा आनंद शब्दांत सांगता न येणारा आहे. त्यांनी आपल्या जिल्ह्यातून शिक्षण घेत केलेली प्रगती कौतुकास्पद अशी आहे.

ही प्रगती अशीच कायम राखण्यासाठी सकारात्मक विचार करणारे व आपल्या जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

मागील ३४ वर्षांत कोकणची परिस्थिती बदलत आहे. पुढच्या काळात ही परिस्थिती पूर्णपणे बदलायची आहे.कोकणात परिवर्तन करू शकलो याचा आनंद आहे असं मत नारायण राणेंनी व्यक्त केल.

विरोधकांकडे नारायण राणे सोडून अन्य विषय नाहीत. केवळ टीका करण्याच काम ते करत आहेत. त्यामुळे जनता आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आमचा विजय निश्चित आहे. मात्र, मला नुसतं जिंकायचं नाही तर दोन ते अडीच लाख मताधिक्यान निवडून यायच आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा व मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.