मोदींचे हात बळकट करण्यासाठी हक्काचा माणूस खासदार बनवा-आमदार योगेश कदम

दापोली | प्रतिनिधी-देशामध्ये मोंदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला रायगड लोकसभा मतदार संघातून हक्काचा माणूस दिल्लीला पाठवायचा आहे. तटकरेंच्या रूपाने या मतदार संघाला केंद्रीय मंत्री पद निश्चितच मिळेल व आतापर्यंत रखडलेला विकास नक्कीच मार्गा लागेल असे सांगतानाच यापूर्वा जे खासदार होते त्यांच्यासमवेत आम्ही काम केले आहे. त्यांच्याकडे विकासकामांचे कोणतेच व्हिजन नाही असे मत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खा. सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार योगेश कदम म्हणाले की, दापोली मतदार संघामध्ये सर्व महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगला समन्वय असून देशामध्ये पंतप्रधानपदी पुन्हा मोदींना विराजमान करण्यासाठी सर्व एक दिलाने काम करत आहेत. संपूर्ण रायगड लोकसभा मतदार संघामध्ये सर्वाधिक मताधिक्य हे दापोली विधानसभा मतदार संघातून दिले जाईल असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. यापूर्वा जे खासदार होते त्यांनी 6 टर्म खासदारकी उपभोगली दोन वेळा केंद्रामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र संपूर्ण मतदार संघामध्ये कोणतेही विकासकाम केले नाही. आतापर्यंत आम्ही त्यांच्यासमवेत होतो. त्यामुळे आपलाच उमेदवार असल्याने बोलू शकत नव्हतो. मात्र आता ती अडचण राहिली नाही. महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना आपल्याला भावी मंत्री म्हणून पहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी एक दिलाने काम करून त्यांना विजयी करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे म्हणाल्या की, खासदार सुनील तटकरे यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित झाल्यावर पेण पासून गुहागरपर्यंत प्रत्येक मतदार संघामध्ये महायुतीचे कार्यकर्ते हे एक दिलाने काम करत आहेत. प्रत्येक मतदार संघात किती मताधिक्य दिले जाणार याची चर्चा होत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघामध्ये केंद्रातील अधिकाधिक योजना ते निश्चितच आणतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी भाजपाचे सर्व कार्यकर्ते हे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील कार्यकर्त्यांसमवेत एक दिलाने काम करत असल्याचे सांगितले. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, शिवसेनेचे प्रदीप सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, महिला जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, शहराध्यक्ष नितीन मयेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उन्मेश राजे, महिला आघाडी रोहिणीताई दळवी, माजी जि.प. अध्यक्ष उदय खांडके, भाजपाच्या सौ. स्मिता जावकर, श्रीराम इदाते यांच्यासह महायुतीतील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.