दापोली, मंडणगडसह खेड येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

 

दापोली | प्रतिनिधी: बुधवारी पहाटे दापोली, मंडणगडसह खेड तालूक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी बागायतदारांसह सर्वांचेच नुकसान झाले आहे.या घटनेने नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दापोली, मंडणगडसह खेडमध्ये मंगळवारी रात्रौ 12 नंतर पावसाला सुरुवात झाली, सकाळी 3 वाजेपर्यंत अधुन मधुन पावसाच्या सरी बरसत होत्या. पहाटे पडलेल्या पावसाने हजेरी लावली असली तरी या अवकाळी पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरीक मात्र सुखावले असले तरी यावेळी महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने त्यांची गैरसोय झाली. वातावरणात पहाटे चांगलाच गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागात 8.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. काल दिवसभरात मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोली चे तापमान 34 अंशावर गेले होते.

सध्या हिवाळी हंगाम सुरू असला तरी हवेत गारवा तसा कमीच जाणवत होता. त्यामुळे वातावरणीय बदलाची निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकरी बागायतदार चिंतेत होते. अशातच निसर्गाने आपला चमत्कार दाखवत माणसे जशी क्षणा क्षणाला बदलतात ना? तसे निसर्गानेही बदलून आपली किमया दाखवत बरसण्यात सुरूवात केली त्यामुळे निसर्गावर मात करण्याच्या मानव निर्मित प्रयत्नाला निसर्गाने बरसून चांगलाच दणका दिला. अचानक बरसण्याच्या या प्रकाराने अनेकांचे नुकसान झाले आहे. यात शेतकरी आणि बागायतदार यांचे प्रामुख्याने खुपच मोठे नुकसान तर झाले आहेच शिवाय गवत भिजल्याने गुरांना खायला घालण्यात येणारे गवत अर्थातच वैरण भिजल्याने मोठीच पंचाईत झाली आहे.पावसाची परिस्थिती नसल्याने अनेकांनी बाहेर उघडयावर ठेवलेले सामान पावसाच्या पाण्याने भिजल्याने नुकसानीतून कोणीही सुटले नाहीत. हापूस आंब्याला अधिक धोका असल्याने आंबा पिकाची फळधारणा आता होईलच याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. त्यात फळधारणेचा प्रकार घडलाच तर कमी प्रकार असेल त्यामुळे शेतकरी बागायतदारांना आधार देण्यासाठी शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा देण्याचे काम करायला हवे.

मंडणगडसह दापोलीत रस्ते बांधकाम आदी विविध प्रकारची विकासकामे जोमाने सुरू आहेत. यासाठी पर राज्यातून मजूर म्हणून येथे आलेल्या कामगारांची अचानक कोसळलेल्या पावसाने त्रेधातिरपीट उडाली.